आत्मज्ञान सर्व विद्यांचा राजा असून अत्यंत गोपनीय, परमपवित्र, परमश्रेष्ठ आहे
अध्याय नववा
श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुना अत्यंत गुह्य असे हे ब्रह्मज्ञान, प्र अर्थाचापंचज्ञानासह, तुला पुन्हा सांगतो. हे जाणल्याने तू अशुभातून मुक्त होशील ह्या
आता गुपित हे थोर सांगतो निर्मळा तुज । विज्ञाने कसिले ज्ञान अशुभांतूनि सोडवी ।। 1 ।। हा श्लोक आपण अभ्यासत आहोत. येथे ज्ञान म्हणजे आत्मज्ञान आणि विज्ञान म्हणजे ब्रम्हांडाचा भगवंतांनी मांडलेला पसारा. ह्यापूर्वी देवांनी माणसाने स्वत:चा उद्धार कसा करून घ्यावा ह्याबद्दल सांगितले असले तरी आपण त्यांचे न ऐकता स्वत:चे डोके कसे चालवतो आणि आपला आपण घात करून घेतो हे आपल्या नीट लक्षात यावे म्हणून ते पुन्हा ज्ञान आणि विज्ञान ह्यातील फरक समजावून सांगत आहेत.
ज्ञान आणि विज्ञान हे दोन्ही विषय वेगवेगळे आहेत आणि मायेच्या प्रभावात गुंतलेल्या लोकांनी विज्ञानात म्हणजे प्रपंचात गुंतून न पडता ज्ञानाची कास धरावी अशी भगवंतांची इच्छा आहे. ह्या अध्यायात लोकांचा उद्धार होण्याच्या दृष्टीने त्यांची सध्याची वर्तणूक कशी आहे आणि त्यांचा उद्धार होण्याच्या दृष्टीने ती कशी असायला हवी ह्याबद्दल सांगितले आहे. ज्याप्रमाणे आपल्या लेकराबाळांचे भले व्हावे असे प्रत्येक मातापित्याला वाटत असते आणि लेकरांना वळण लावण्यासाठी न थकता ते वारंवार प्रयत्न करत असतात. त्याप्रमाणे समस्त जगाचे मातापिता असलेल्या भगवंतांना सर्व लोकांचा उद्धार व्हावा अशी तळमळ लागून राहिलेली असल्याने लोकांच्या वागण्याकडे दुर्लक्ष करून त्यांचे भले व्हावे म्हणून अत्यंत कळकळीने ही गोष्ट ते पुन:पुन्हा सांगत आहेत.
ह्या गुह्य गोष्टीबद्दल बोलताना पुढील श्लोकात भगवंत म्हणाले, हे ज्ञान सर्व विद्यांचा राजा असून अत्यंत गोपनीय, परम-पवित्र, परम-श्रेष्ठ आहे. ते धर्मानुसार असल्याने सुखदायी आहे.
राज-विद्या महा-गुह्य उत्तमोत्तम पावन। प्रत्यक्ष हे सुखे लाभे धर्म-सार सनातन ।। 2 ।।
श्लोकाच्या विवरणात माउली म्हणतात, भगवंतांनी अर्जुनाला असे सांगितले की, आता तुला सहजच प्रपंचज्ञानासहित आत्मज्ञान सांगेन. ज्याप्रमाणे राजहंसाने आपल्या चोचीने एकत्र मिसळलेले दूध व पाणी वेगळे करावे, त्याप्रमाणे तुला ज्ञान व विज्ञान हे वेगवेगळे सांगतो. प्रथम ज्ञानाबद्दल सांगताना भगवंत म्हणाले, माणसात हे ज्ञान असतेच पण संसाराच्या मोहात गुंतल्याने निरर्थक अनात्म गोष्टीनी ते झाकोळून गेले असते कारण ज्ञानाच्या मानाने निरर्थक गोष्टींचे प्रमाण खूपच मोठे असते. जेव्हा एकत्र मिसळलेले कण व भूस वाऱ्याच्या धारेवर उफणले असता, त्यातील कोंडा उडून जाऊन धान्याची आपोआप रास जमते त्याप्रमाणे ह्या ज्ञानाचा प्रकाश माणसाच्या अंतरंगात पडला की, इतर निरर्थक अनात्मगोष्टी माणसाच्या मनातून दूर उडून जातात. त्यामुळे हे शुद्ध ज्ञान माणसाला मोक्षरूपी लक्ष्मीच्या पटावर बसवते. हे ज्ञान सर्व विद्याचा राजा, सर्व गुह्यांचा स्वामी, पवित्र, उत्कृष्ठ, प्रत्यक्ष अनुभावास येणारे, धर्माला अनुसरून असलेले, सहज आचरण करता येणारे आणि क्षयरहित आहे.
क्रमश:
