ईश्वर भक्तीतून आत्मज्ञान होते
अध्याय नववा
अध्यायाच्या समारोपाचा श्लोक आपण अभ्यासत आहोत. तो श्लोक असा, इति क्षेत्रं तथा ज्ञाता ज्ञानं ज्ञेयं मयेरितम् । अखिलं भूपते सम्यगुपपन्नाय पृच्छते ।। 41 ।। त्यानुसार बाप्पा म्हणतात, क्षेत्र म्हणजे शरीर, त्याला जाणणारा तो क्षेत्रज्ञ आणि क्षेत्रक्षत्रज्ञविचार समजून घेणे हेच खरे ज्ञान होय. प्रत्येक शरीरात मी, आत्म्याच्या रूपाने वास करत असतो. ईश्वराने मायेचा उपयोग करून सृष्टीनिर्मिती केली आहे. मायेतून तयार केलेली प्रत्येक वस्तू त्रिगुणयुक्त असते. मनुष्य सोडून इतर प्राणिमात्रांच्या शरीरात त्रिगुणांच्यापैकी तमोगुण सगळ्यात प्रभावी असतो पण मनुष्याच्या शरीरात सत्व, रज किंवा तम यापैकी एक गुण प्रभावी असतो आणि त्याप्रमाणे त्याची समाजात वागणूक होत असते. मनुष्याच्या पूर्वकर्मानुसार त्याचं प्रारब्ध ठरत असतं. मनुष्याचा स्वभाव ठरताना त्याच्या प्रारब्धाचा मुख्य वाटा असतो.
सत्वगुणी माणूस सरळ चालीचा असून धार्मिक असतो. रजोगुणी माणसाला धर्म, अधर्म ह्यापेक्षा फळाच्या इच्छेने कर्म करण्यात धन्यता वाटते तर तमोगुणी माणसाला आपण करतोय तेच बरोबर आहे असे वाटत असते. माणसाच्या जीवनात घडणाऱ्या गोष्टी पूर्वनियोजित असतात. मनुष्याचा स्वभाव व जीवनातील प्रसंग जर, पूर्वनियोजित असतील तर, नियतीच्या हातातलं खेळणं झालेल्या मनुष्याच्या हातात काय असतं असा विचार केल्यास लक्षात येईल की, प्रयत्नपूर्वक मनुष्य स्वत:चा स्वभाव बदलून सात्विक करू शकतो. आत्म्याचे परमात्म्याशी मिलन घडवून आणणे हे जीवनातले सर्वोच्च ध्येय साध्य करायचं असेल तर प्रारब्धानुसार मिळालेला स्वभाव कसाही असला तरी माणसाला त्याचं सत्वगुणी स्वभावात रूपांतर करता येतं. त्यासाठी नितिनियमानं वागून प्रसंग कसाही, कोणताही येउदेत मी माझी तत्वे सोडणार नाही असं ठरवून जो वागेल त्याच्या जीवनशैलीत निश्चित फरक पडेल. वाल्या कोळी लोकांना लुटून ठार मारायचा पण नारद मुनींच्या उपदेशानुसार त्याने नामस्मरण करून सत्वगुण इतका वाढवला की, त्याचं वाल्मिकी ऋषित रूपांतर झालं. मनुष्याने एकदा नितिनियमानुसार चालायचा निश्चय केला की, त्याच्या निश्चयात तसेच त्याबरहुकूम वागण्यात नियती अडथळा आणू शकत नाही. उलट त्याचा निश्चय तडीला नेण्यासाठी भगवंत बळ देत असतात. त्याच्या अडीअडचणीला भगवंत धावून येऊन त्याला मदत करतात. प्रारब्धातून येणाऱ्या अडीअडचणी जरी ते दूर करत नसले तरी त्या सुसह्य करायचं काम ते करतात.
सत्वगुणाची वाढ होण्याच्या दृष्टीने अभिमान नसणे, दांभिकपणा न करणे, म्हणजे मनात नसताना एखादी गोष्ट करण्याचा आव न आणणे, दुसऱ्याला त्रास न देणे, कपटीपणा सोडणे म्हणजे कुणाची ठरवून फसवणूक न करणे, सद्गुरूंच्या, संतांच्या सांगण्यानुसार वागणे, अंतर्बाह्य शुद्धी ठेवणे, शांत राहणे, जन्ममरण, वार्धक्य आदि दु:खरूप गोष्टीत मनाचं स्थैर्य टिकवून ठेवणे, आशा, अपेक्षा न बाळगणे, संसारिक कर्तव्ये निरपेक्षतेनं चोख बजावणे, सर्वांविषयी आदरभाव ठेऊन त्यांच्याशी योग्य वर्तणूक करणे, ईश्वराची अढळ श्रद्धेने भक्ती करणे, योगाभ्यास करून मन स्थिर ठेवणे आणि ईश्वराच्या स्मरणात राहणे इत्यादी गोष्टींचे पालन करणे आवश्यक आहे. याप्रमाणे वागत गेल्यास, ईश्वर भक्तीतून आत्मज्ञान होते आणि त्यामुळे ईश्वराचे मूळ स्वरूप समजते. तसेच संसार हा तात्पुरता असून, ईश्वर हा चिरंतन आहे हे लक्षात येऊन मनुष्य सदैव त्याच्या स्मरणात राहून त्याचे आयुष्य ईश्वराच्या अपेक्षेनुसार व्यतीत करून शेवटी त्याला जाऊन मिळतो. म्हणजे त्याचा आत्मा मुक्त होऊन ईश्वरात विलीन होतो आणि त्याच्या जीवनातील उत्तम योग साधला जातो.
अध्याय नववा समाप्त