For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आत्मसन्मान हे यशाचे सूत्र : डॉ.किरण ठाकुर

12:21 PM Mar 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
आत्मसन्मान हे यशाचे सूत्र   डॉ किरण ठाकुर
Advertisement

‘आत्मसन्मानच सर्व काही’ पुस्तकाचे पुणे येथे प्रकाशन

Advertisement

पुणे : आत्मसन्मानाच्या अभावामुळे व्यक्तीला मानसिक त्रासातून जावे लागते. त्यामुळे आत्मसन्मान आणि आत्मविश्वास बाळगणे हे यशाचे सूत्र आहे, असे मत तऊण भारतचे समूह प्रमुख व सल्लागार संपादक आणि लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप.सोसायटीचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. किरण ठाकुर यांनी येथे व्यक्त केले.नीळकंठ प्रकाशनतर्फे न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रॅमिंग (एनएलपी) या वर्तनशास्त्राच्या मास्टर टेनर आणि समुपदेशक रविबाला काकतकर लिखित ‘आत्मसन्मानच सर्व काही !...’ या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. किरण ठाकुर यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर मोहिनी पंड्या, मंजिरी लाटे, हुजुरपागा शाळेच्या माजी मुख्याध्यापिका अलका काकतकर आणि लेखिका रविबाला काकतकर उपस्थित होत्या.

यावेळी बोलताना डॉ. किरण ठाकुर म्हणाले, अस्वस्थ आणि चंचल मनामुळे शरीरस्वास्थ्य बिघडू शकते. आज प्रत्यक्ष जगण्यापेक्षा आभासी जगणे वाढले असून, माणसे एकमेकांपासून दूर जात आहेत. सभोवतालचे विश्व मनावर आघात करते. त्याला खंबीरपणे तोंड देण्यासाठी, मन:स्वास्थ्य जोपासण्यासाठी आत्मसन्मान आवश्यक आहे. आपल्या इच्छा, संकल्प, ध्येय यांचे नियोजन कसे करावे, इतरांशी कसे वागावे, आत्मसन्मान कसा उंचावावा यासाठी हे पुस्तक मार्गदर्शक ठरेल. नाती जोपासण्यासाठी वेळप्रसंगी माफी मागणे, क्षमा करणे, मनावरचा ताण, पूर्वग्रह दूर होण्यासाठी, जीवन आनंदी कसे जगावे ही सर्व कौशल्ये जोपासण्यासाठी वर्तनशास्त्रातील नियम अवलंबावे लागतील.

Advertisement

रविबाला काकतकर म्हणाल्या, अन्न, वस्त्र, निवारा या आदिमानवाच्या मूलभूत गरजांनंतर उत्क्रांती झालेल्या सुसंस्कृत मानवाच्या मूलभूत गरजांमध्ये आज अनेक नवीन क्षेत्रे आणि पैलू अंतर्भूत झाले आहेत. आपल्यावर कोणी प्रेम करावे, आपण  कोणाला मदत करावी, समाजाकडून आदर प्राप्त व्हावा, या सारखाच उंचावलेला  आत्मसन्मान असणे ही देखील एक मूलभूत गरज बनली आहे. आत्मसन्मान  आपल्याला प्रगतीच्या शिखरावर किंवा अभाव  अधोगतीच्या पातळीवर नेऊ शकतो. ही प्रेरणा आपल्या अस्तित्वाशीच निगडीत आहे. अलका काकतकर यांनी “हे पुस्तक म्हणजे एक रेडी रेकनर आहे”, असे सांगत पुस्तकाविषयी विस्तृत विवेचन केले. नीळकंठ प्रकाशनाचे संचालक मुकुल मारणे यांनी प्रकाशकीय मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहिनी पंड्या यांनी केले. मंजिरी लाटे यांनी आभार मानले.

Advertisement
Tags :

.