आशियाई स्पर्धेसाठी निवड चाचणी
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
आगामी आशियाई चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी येथील इंदिरा गांधी क्रीडा संकुलामध्ये 15 मार्चपासून अखिल भारतीय कुस्ती फेडरेशनने निवड चाचणी घेण्याचे ठरविले आहे. आता भारतीय कुस्ती फेडरेशनच्या नव्या प्रशासकीय समितीच्या देखरेखेखाली ही पहिली अधिकृत निवड चाचणी घेतली जाणार आहे.
21 डिसेंबर 2023 रोजी भारतीय कुस्ती फेडरेशनची कार्यकारिणी निवडण्यात आली होती. त्यानंतर केवळ तीन दिवसांच्या कालावधीनंतर या कुस्ती फेडरेशनवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. पण दोन दिवसांपूर्वीच भारतीय क्रीडा मंत्रालयाने या फेडरेशनवरची निलंबनाची कारवाई मागे घेतली. आता या निवड चाचणीमध्ये देशातील अव्वल मल्ल सहभागी होणार आहेत. 25 ते 30 मार्च दरम्यान आशियाई चॅम्पियनशीप स्पर्धा जॉर्डनमध्ये घेतली जाणार आहे. या स्पर्धेत पुरुष आणि महिलांची फ्रिस्टाईल व ग्रिकोरोमन लढती होणार आहेत.