ग्रंथालय पुस्तक निर्मितीसाठी मनोहर परब यांच्या पुस्तकाची निवड
ओटवणे प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्या समग्र शिक्षा २०२४ -२५ अभियांतर्गत ग्रंथालय पुस्तक निर्मितीसाठी कारीवडे गावचे सुपुत्र तथा बांदा पानवळ प्राथमिक शाळेचे शिक्षक, बालसाहित्यिक कवी मनोहर परब यांच्या 'चांगल्या सवयी' या पुस्तकाची निवड करण्यात आली आहे.महाराष्ट्रातील जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांना महाराष्ट्र शासनाने वाचनीय पुस्तके उपलब्ध करून दिली आहेत .त्यामध्ये आजच्या बदलत्या तंत्रज्ञानाच्या वापरातही विद्यार्थ्यांमध्ये चांगल्या सवयीचे जतन आणि रुजवणूक व्हावी यासाठी बालवयात ''चांगल्या सवयी'' पुस्तक महत्त्वपूर्ण ठरले असून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी या बोलत्या पुस्तकाचे जणु स्वागतच केले आहे.विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांसाठी विविध वाचनीय पुस्तके उपलब्ध करून विद्यार्थी पुस्तकभिशी या उपक्रमातून विद्यार्थ्यामध्ये वाचनाची, लिहिण्याची गोडी निर्माण केली. अशा प्रयोगातूनच मनोहर परब यांच्या संकल्पनेतून विद्यार्थीनिर्मित ऊब ( काव्यसंग्रह), उमलते भाव संवेदन (कथासंग्रह ) कोरोना लॉकडाऊन एक जीवनानुभव ( ललित गद्य ) या तीन पुस्तकांची नोंद महाराष्ट्र शासनाने घेतली असून विशेष समारंभात कौतुकही केले आहे. महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण व क्रिडा विभागाच्यावतीने अध्यापन निर्मितीमध्ये मनोहर परब यांनी नाविन्यपूर्ण शैक्षणिक अध्यापन पद्धती तयार करून महाराष्ट्रात आपल्या शाळेची मोहर उमटवून जि. प. प्राथमिक बांदा पानवळ शाळा सर्वोत्तम ठरली असे अनेक विविध शैक्षणिक प्रयोग करणारे कवी मनोहर परब यांची अनेक पुस्तके प्रकाशित आहेत. हे प्रयोगशिल शिक्षक असून शासनाच्या ग्रंथालय पुस्तक निर्मितीसाठी त्यांच्या 'चांगल्या सवयी' या पुस्तकाची निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.