कुडाळच्या बँ.नाथ पै विद्यालयाच्या कबड्डी संघाची विभागस्तरावर निवड
कुडाळ -
ओरोस येथील क्रीडा संकुल येथे झालेल्या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत कुडाळ - कुडाळेश्वरवाडी येथील बॅ.नाथ पै विद्यालयाच्या 14 वर्षे वयोगटातील मुलांच्या कबड्डी संघाने बाजी मारली. या संघाची विभागस्तरावर निवड झाली आहे. या यशाबद्दल या संघातील खेळाडू व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन होत आहे. ओरोस येथे शनिवारी जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा घेण्यात आली. यात येथील बँ.नाथ पै.विद्यालयाच्या 14 वर्षाखालील मुलांच्या संघाने पहिल्या सामन्यात कळसुलकर हायस्कूल ( सावंतवाडी ) ,तर दुसऱ्या सामन्यात कट्टा हायस्कूल ( मालवण ) च्या संघावर मात करून अंतिम फेरीत प्रवेश केला. न्यू इंग्लिश स्कूल ( फोंडाघाट - कणकवली ) या संघाबरोबर अंतिम सामना रंगतदार झाला अखेर आपल्या सांघिकतेच्या जोरावर बँ.नाथ पै.विद्यालयाच्या संघाने विजेतेपद पटकावले. या यशाने या विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.
14 वर्षे वयोगटातील मुलांच्या संघात आदित्य दिनेश भारद्वाज, वेदांत चंद्रहास कुपेरकर, ओम सुभाष कोकरे, देवांग संजय परब, अथर्व महेश वेंगुर्लेकर, सर्वेश संतोष पालव, रोहित मोतीराम वडजे, राहुल दशरथ राठोड ,उमेश गुंडाप्पा राठोड, आनंद लवांकुश चौहान, दुर्वांक सूर्यकांत तवटे, ऋग्वेद आत्माराम धर्णे सहभागी झाले होते. या संघातील खेळाडू व त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक नीलेश राठोड यांचे विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रेमदास राठोड ,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले तसेच विभागस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.