राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदासाठी भजनलाल शर्मा यांची निवड
वृत्तसंस्था / जयपूर
राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदासाठी भारतीय जनता पक्षाने भजनलाल शर्मा यांची निवड केली आहे. ते या विधानसभा निवडणुकीत प्रथमच आमदार बनले आहेत. यापूर्वी ते चारवेळा राजस्थान भाजपचे महासचिव होते. मंगळवारी दुपारी चार वाजता झालेल्या भाजपच्या विधिमंडळ पक्ष बैठकीत त्यांची निवड एकमुखाने त्यांची निवड करण्यात आली. त्यांचे नाव माजी मुख्यमंत्री वसुंधराराजे सिंदिया यांनी सुचविल्याची माहिती बैठकीनंतर पत्रकारांना देण्यात आली आहे.
राजस्थान विधानसभा निवडणुकीची मतगणना 3 डिसेंबरला झाली होती आणि त्याच दिवशी परिणाम समोर आला होता. भारतीय जनता पक्षाला निवडणूक झालेल्या 199 मतदारसंघांपैकी 116 मतदारसंघांमध्ये यश मिळाले होते. दर पाच वर्षांनी सत्तापरिवर्तन करण्याची आपली गेल्या 30 वर्षांची परंपरा या राज्यात या निवडणुकीतही राखली होती. निवडणुकीचा परिणाम समोर आल्यानंतर 9 दिवसांनी नव्या मुख्यमंत्र्यांची निवड करण्यात आली. लवकरच ते शपथग्रहण करतील.
दोन उपमुख्यमंत्री राहणार
भजनलाल शर्मा यांना दोन उपमुख्यमंत्र्यांचे सहकार्य मिळणार आहे. दियाकुमारी आणि प्रेमचंद बैरवा अशी त्यांची नावे आहेत. दियाकुमारी या रजपूत राजघराण्यातील असून बैरवा हे बेरवा किंवा बैरवा या अनुसूचित जातीतील आहेत. अशा प्रकारे भारतीय जनता पक्षाने सामाजिक मिश्रणाचा नवा प्रयोग केला आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. छत्तीसगडच्या मुख्यमंत्रीपदी भाजपने रविवारी वनवासी समाजातील नेते विष्णू देव साय यांची निवड केली आहे. तर मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्रीपदासाठी अन्य मागासवर्गिय समाजातील नेते मोहन यादव यांची सोमवारी निवड केली आहे. या सर्व नियुक्त्यांच्या माध्यमातून पक्षाने नवे नेतृत्व विकसीत करण्याच्या प्रक्रियेचा प्रारंभ केल्याचे दिसून येत आहे.
कोण आहेत भजनलाल शर्मा
भजनलाल शर्मा हे 56 वर्षांचे असून त्यांनी राजस्थान विद्यापीठाची एमए पदवी राजशास्त्र या विषयात प्राप्त केली आहे. ते यावेळी प्रथमच राज्याच्या विधानसभेत आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्यांनी सांगानेर मतदारसंघातून काँग्रेसचे पुष्पेंद भारद्वाज यांचा 48 हजारांहून अधिक मतांनी पराभव केला आहे. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्षाच्या शीर्ष नेतृत्वाच्या जवळचे मानले जातात. ते तरुण वयापासूनच भाजपच कार्यकर्ते आहेत.