एसजीएफआय स्पर्धेसाठी आर्णा आसुंडीची निवड
बेळगाव : बेंगळूर येथील रामनगर जिल्हा येथे शिक्षण खात्यातर्फे घेण्यात आलेल्या 14 वर्षाखालील प्राथमिक विभागीय षटल बॅडमिंटन स्पर्धेत बेळगावच्या आर्णा आसुंडीने विजेतेपद पटकावित एसजीएफआय बॅडमिंटन स्पर्धेसाठी पात्र ठरली आहे. रामनगर येथे झालेल्या स्पर्धेत सेंट जोसेफ बेळगावची बॅडमिंटनपटू 14 वर्षाखालील गटात उपांत्यपूर्व फेरीत बेळगाव विभागीय संघाचे प्रतिनिधीत्व करताना गुलबर्ग विभागीय संघाच्या तमन्ना हिचा आर्णाने 21-9, 21-11 अशा सरळ सेट्समध्ये तर दुहेरीत आर्णा व आस्ता या जोडीने तमन्ना व एन. एस. गौडा या जोडीचा 21-11, 21-7 अशा सेट्समध्ये पराभव करुन उपांत्य फेरीत प्रवेश केला. उपांत्य फेरीत एकेरीत आर्णाने म्हैसूर विभागाच्या उन्नती हिचा 21-14, 21-14 तर दुहेरीत उन्नती व रक्षा या जोडीचा 21-11, 15-21, 21-12 अशा सेट्समध्ये पराभव करुन अंतिम फेरीत प्रवेश केला.
अंतिम सामना बेंगळूर विभागीय संघाशी झाला. त्यामध्ये एकेरीत आर्णा ही रक्षा एन. कडून 21-13, 21-11 अशा सरळ गेम्समध्ये पराभव पत्करावा लागला. दुहेरीत आर्णा व आस्था या जोडीने रक्षा व नंदीया या जोडीचा 19-21, 21-17, 21-18 अशा सेट्समध्ये पराभव करुन विजेतेपद पटकाविले. तीन सामन्यात 1-1 अशी बरोबरी साधल्याने रिव्हर्स एकेरीत आस्थाने लक्षा जी. रावचा 21-9, 21-11 अशा सेट्समध्ये पराभव करुन विजेतेपद पटकाविले. आर्णा आसुंडी हिला एनआयएस बॅडमिंटन प्रशिक्षक भूषण अन्वेकर यांचे मार्गदर्शन तर आनंद हावण्णावर व अशोक पाटील यांचे प्रोत्साहन लाभत आहे. या स्पर्धेत आर्णा आसुंडीने केलेल्या कामगिरीची दखल घेऊन राष्ट्रीय एसजीएफआय स्पर्धेसाठी कर्नाटक संघात स्थान मिळाले आहे.