खासगी प्राथमिक शाळा कर्मचाऱ्यांची निवड श्रेणी मंजूर
कोल्हापूर
खासगी प्राथमिक शाळेतील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे निवडश्रेणी प्रस्ताव गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित होते. या प्रलंबित निवड श्रेणी प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे. परिणामी कोल्हापूर शहर जिल्ह्यासह राज्यातील हजारो शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 1 जानेवारी 2024 या शासन निर्णयाचा फायदा होणार आहे.
कोल्हापूर शहरातील वीस कर्मचाऱ्यांच्या प्रस्तावांना प्राथमिक शिक्षण समितीचे प्रशासनाधिकारी आर. व्ही. कांबळे यांनी मंगळवारी मंजुरी दिली. खाजगी प्राथमिक शाळांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लिपिक व सेवक हे एकाकी पद असल्यामुळे या पदाला 24 वर्ष सेवा पूर्ण झाल्यानंतर दिला जाणारा निवड श्रेणीचा लाभ दिला जात नव्हता. पण राज्यातील सर्वच कर्मचाऱ्यांना हा लाभ मिळावा यासाठी खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघाच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती. या याचिकेचा निकाल कर्मचाऱ्यांच्या बाजूने लागला. पण राज्य शासनाने त्या निर्णयाविरोधात पुनर्विचार याचिका दाखल केली. त्यामुळे गेल्या अनेक वर्ष शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना हा लाभ मिळाला नव्हता. पण 1 जानेवारी 2024 रोजी शासनाने राज्यातील सर्व प्राथमिक माध्यमिक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना निवड श्रेणीचा लाभ देण्याबाबत आदेश दिला. या प्रस्ताव मंजुरीसाठी खाजगी प्राथमिक शिक्षक महासंघाने सातत्यपूर्ण पाठपुरावा केला. मंजुरीचे आदेश वितरणावेळी प्रशासनाधिकारी आर. व्ही. कांबळे, एम. डी. पाटील, राजेंद्र कोरे, प्रदीप मगदूम, सागर जाधव, जितेंद्र पाटील, विद्या बारामते, अनघा अग्निहोत्री, सुस्मिता जोशी, अर्जुन कांबळे, फिरोज नायकवडी, रुपाली कुलकर्णी आदी उपस्थित होते.