पारंपरिक पद्धतीने सीमोल्लंघन उत्साहात
शहरातून पालखी मिरवणूक : हजारो नागरिकांच्या उपस्थितीत रंगला सोहळा
बेळगाव : बेळगावमध्ये पारंपरिक पद्धतीने गुरुवारी मराठी विद्यानिकेतन शाळेच्या पटांगणावर सीमोल्लंघन सोहळा पार पडला. विजयादशमी दिवशी शहरात सर्व देवदेवतांची भव्य मिरवणूक काढून त्यानंतर एकत्रितपणे कॅम्प येथे सीमोल्लंघन सोहळा पार पडला. हा सोहळा पाहण्यासाठी व पालख्यांचे दर्शन घेण्यासाठी हजारोंच्या संख्येने भाविक सहभागी झाले होते. चव्हाट गल्ली येथील देवदादा सासनकाठी मंदिरापासून कटल्याची मिरवणूक काढण्यात आली. मारुती गल्ली येथील मारुती मंदिरापासून मुख्य मिरवणुकीला प्रारंभ झाला. शहरातील कपिलेश्वर, समादेवी, मातंगी यासह मारुती मंदिराचे वाहन, कसाई गल्ली, बसवाण गल्ली येथील देवीचे वाहन मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते.
सीमोल्लंघनाचे चोख नियोजन
यावर्षी विद्यानिकेतन शाळेच्या पटांगणावर सीमोल्लंघन सोहळ्यासाठी चोख नियोजन करण्यात आले होते. नवरात्र उत्सव महामंडळाच्यावतीने सर्व भाविकांच्या सोयीसाठी प्लॅटफॉर्म उभे करण्यात आले होते. तसेच मुख्य स्टेज उभा करण्यात आला होता. यामुळे भाविकांना सूचना करण्यासोबत पालख्यांचे दर्शन घेणे सोयीचे झाले. यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात आले.