For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पारंपरिक पद्धतीने सीमोल्लंघन उत्साहात

12:44 PM Oct 04, 2025 IST | Tarun Bharat Portal
पारंपरिक पद्धतीने सीमोल्लंघन उत्साहात
Advertisement

शहरातून पालखी मिरवणूक : हजारो नागरिकांच्या उपस्थितीत रंगला सोहळा

Advertisement

बेळगाव : बेळगावमध्ये पारंपरिक पद्धतीने गुरुवारी मराठी विद्यानिकेतन शाळेच्या पटांगणावर सीमोल्लंघन सोहळा पार पडला. विजयादशमी दिवशी शहरात सर्व देवदेवतांची भव्य मिरवणूक काढून त्यानंतर एकत्रितपणे कॅम्प येथे सीमोल्लंघन सोहळा पार पडला. हा सोहळा पाहण्यासाठी व पालख्यांचे दर्शन घेण्यासाठी हजारोंच्या संख्येने भाविक सहभागी झाले होते. चव्हाट गल्ली येथील देवदादा सासनकाठी मंदिरापासून कटल्याची मिरवणूक काढण्यात आली. मारुती गल्ली येथील मारुती मंदिरापासून मुख्य मिरवणुकीला प्रारंभ झाला. शहरातील कपिलेश्वर, समादेवी, मातंगी यासह मारुती मंदिराचे वाहन, कसाई गल्ली, बसवाण गल्ली येथील देवीचे वाहन मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते.

या सर्व पालख्या ढोल-ताशांच्या गजरात शहरातून कॅम्प येथील मराठी विद्यानिकेतनच्या पटांगणावर दाखल झाल्या. मानकरी रणजित चव्हाण-पाटील यांच्या हस्ते शमीचे पूजन करण्यात आले. त्यांच्यासोबत चव्हाण-पाटील कुटुंबीयांतील सर्व प्रमुख मंडळी उपस्थित होती. शस्त्रपूजन झाल्यानंतर सोने लुटण्याचा कार्यक्रम झाला. मैदानावर होणारी गर्दी टाळण्यासाठी शंभू जत्ती महादेव मंदिराजवळच पार्किंगची व्यवस्था करण्यात आली होती. या कार्यक्रमावेळी पोलीस आयुक्त भूषण बोरसे, माजी आमदार अनिल बेनके, भाजप नेते किरण जाधव, श्रीराम सेना हिंदुस्थानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर, कायदा व सुव्यवस्था विभागाचे उपायुक्त नारायण बरमणी, नवरात्र उत्सव मंडळाचे अध्यक्ष आनंद आपटेकर, मल्लेश चौगुले, मालोजी अष्टेकर, परशराम माळी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

Advertisement

सीमोल्लंघनाचे चोख नियोजन

यावर्षी विद्यानिकेतन शाळेच्या पटांगणावर सीमोल्लंघन सोहळ्यासाठी चोख नियोजन करण्यात आले होते. नवरात्र उत्सव महामंडळाच्यावतीने सर्व भाविकांच्या सोयीसाठी प्लॅटफॉर्म उभे करण्यात आले होते. तसेच मुख्य स्टेज उभा करण्यात आला होता. यामुळे भाविकांना सूचना करण्यासोबत पालख्यांचे दर्शन घेणे सोयीचे झाले. यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात आले.

Advertisement
Tags :

.