मराठीचे बीज गोव्यातून इतरत्र गेले!
केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांचे प्रतिपादन :जागतिक मराठी संमेलनाचा समारोप
पणजी : मराठी मनाचा शोध घेणारे हे जागतिक मराठी संमेलन जागतिक स्तरावर मराठी भाषेला अधिक प्रगल्भ बनवणार, अशी खात्री केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी व्यक्त केली. गोव्यात मराठीचे बीज पोर्तुगीजांपूर्वीपासून रोवलेले असून नंतर ते महाराष्ट्रासह इतरत्र फोफावले. मराठी भाषा, माणूस, संस्कृती ही त्रिसुत्री आता जगातील सर्व देशात पसरली असल्याचे त्यांनी नमूद केले. पणजीतील कला अकादमीत गेल्या तीन दिवसांपासून चालू असलेल्या 21 व्या जागतिक मराठी संमेलनाचा काल रविवारी शानदार समारोप झाला. त्यावेळी प्रमुख पाहुणे या नात्याने नाईक बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, मराठी माणूस, भाषा आणि मन हे मानवतावादी, व्यापक व परिपूर्ण आहे. त्यामुळेच मराठीचा ठसा देशासह जगभरात उमटत आहे. गोव्यात मराठी भजने, आरती घरोघरी, देवळात होतात. ती संस्कृती मराठी भाषेने जगात सर्वत्र टिकवली असून मराठी माणसाने ती जोपासली आहे, असे त्यांनी सांगितले. आजच्या नवीन विज्ञान, तंत्रज्ञान युगातही मराठी भाषा भक्कमपणे उभी असून टिकून आहे. जागतिक स्तरावर मराठी माणूस सर्वत्र पोहोचला असून तेथे संस्कृती जोपासतो आहे. मानवी मूल्ये टिकवण्याचे कामही मराठी भाषेने केले आहे. तिची साहित्यिक क्षमताही मोठी असल्याचे नाईक म्हणाले.
शिक्षण मराठीतून झाल्याने अतुट नाते : कामत
सार्वजनिक बांधकाममंत्री दिगंबर कामत म्हणाले की, मराठी भाषेमुळे चांगले संस्कार टिकून आहे. कोणतीही भाषा भांडणासाठी नसते तर ती बोलण्यासाठी असते. प्राथमिक शिक्षण मराठीतून झाल्यामुळे मराठीशी नाते अतुट असून ती भाषाही उत्कृष्ट, गोड आहे. मराठी माणसाचा विस्तार जगभर झाला असून तिच्यासाठी तरुण पिढीही जागृत बनली आहे आणि मराठीसाठी पुढे येत आहे, असे कामत म्हणाले.
ओठात कोकणी, पोटात मराठी : तानावडे
गोव्यात मराठीची परंपरा जुनी असून ती वर्षानुवर्षे चालत आहे असे सांगून राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे म्हणाले की, आमच्या ओठात कोकणी असली तरी पोटात मात्र मराठी आहे. तिच भाषा आमची सकाळची पेपर वाचनाची भूक भागवते. तसेच संस्कृती टिकवते. संतांची वीरगाथा मराठीतच सापडते. नाती मराठीतच समजतात आणि टिकवली जातात. गोव्याची संस्कृती मराठीच आहे. आपण खासदारकीची शपथ मराठीतूनच घेतल्याचे तानावडे यांनी सांगितले.
स्नेहल दामले यांनी समारोप कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. कवी बा. भ. बोरकर यांचे सुरेख चित्र रेखाटून गोव्याचे चित्रकार संजय हरमलकर यांनी ते जागतिक मराठी अकादमीस भेट दिले. दशरथ परब यांनी सर्वांचे स्वागत, प्रास्ताविक केले तर गौरव फुटाणे यांनी आभार मानले. त्याच कार्यक्रमात राज्य कार्यकारी समितीच्या काही सदस्यांचा सत्कार करण्यात आला. शेवटी चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे यांची महेश म्हात्रे यांनी घेतलेल्या मुलाखतीने संमेलनाची सांगता झाली.