For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आचऱ्यात सुरक्षा यंत्रणा ठप्प, ग्रामस्थांचा संताप

आचऱ्यात सुरक्षा यंत्रणा ठप्प  ग्रामस्थांचा संताप
Advertisement

आचरा प्रतिनिधी : आचरा गावातील सार्वजनिक सुरक्षेसाठी बसविण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे अनेक महिन्यांपासून बंद असल्याने कायदा व सुव्यवस्था, गुन्हे प्रतिबंध आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. हे कॅमेरे तात्काळ सुरू करावेत, अन्यथा १५ ऑगस्ट रोजी लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी ग्रामपंचायत आणि आचरा पोलिस ठाण्याला दिलेल्या निवेदनातून दिला आहे.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, गावातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी असून, वीज बिल न भरल्यामुळे कॅमेरे बंद असल्याची माहिती समोर येत आहे. ही बाब खरी असल्यास संबंधित जबाबदार अधिकारी किंवा व्यक्तींवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
यापूर्वीही यासंदर्भात पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन कळविण्यात आले होते. मात्र, अद्यापही सीसीटीव्ही यंत्रणा सुरू करण्यात आलेली नसल्याचे ग्रामस्थांनी म्हटले आहे. तसेच निवेदनाद्वारे सीसीटीव्ही कॅमेरे बंद असण्याचे नेमके कारण, त्यासाठी जबाबदार अधिकारी किंवा व्यक्ती कोण, कॅमेरे नेमक्या कोणत्या तारखेपर्यंत सुरू होणार आणि भविष्यात अशी परिस्थिती टाळण्यासाठी कोणती उपाययोजना करण्यात येणार, याबाबत लेखी माहिती देण्याची मागणी करण्यात आली आहे.
१५ ऑगस्ट २०२६ पर्यंत गावातील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे सुरू न झाल्यास स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल. आंदोलनाची वेळ, ठिकाण व स्वरूप याची माहिती योग्य वेळी जाहीर करण्यात येणार असल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. सदर निवेदन आचरा ग्रामविकास अधिकारी पद्माकर कासले यांना देण्यात आले. यावेळी रूपेश टेमकर,अनिकेत पांगे,शैलेश सारंग,निलेश घाडी,प्रज्ञेश आचरेकर,गणेश पाटकर,दर्पण आचरेकर ,चिन्मय वस्त ,रोहित भिरंवडेकर ,गौरव पेडणेकर,राकेश यादव,प्रथमेश कांबळी, बंडू पवार आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.