For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अयोध्येत एटीएस कमांडोंचे सुरक्षाकवच

07:00 AM Jan 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
अयोध्येत एटीएस कमांडोंचे सुरक्षाकवच
Advertisement

रामनगरीत प्राणप्रतिष्ठेसाठी विशेष सुरक्षा व्यवस्था : 7 स्तरीय बंदोबस्त असणार : एसपीजी, एनएसजी, पोलिसांकडे महत्त्वाची जबाबदारी

Advertisement

वृत्तसंस्था /अयोध्या

Advertisement

राममंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी अयोध्येतील सुरक्षा वाढविण्यात आली आहे. उत्तरप्रदेशच्या दहशतवादविरोधी पथकाच्या कमांडोंना अयोध्येत तैनात करण्यात आले आहे. 22 जानेवारी रोजी होणारा सोहळा आणि 26 जानेवारी रोजीचा प्रजासत्ताक दिन विचारात घेत शहरात मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. उत्तरप्रदेश पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून आर्टिफिशियल इंटेलिजेन्स आधारित अँटी-माइन ड्रोनही तैनात केले आहेत. अयोध्येवर ड्रोन आणि आर्टिफिशियल इंटेलिजेन्सने युक्त प्रशिक्षित सुरक्षा दलांची करडी नजर आहे. परंतु सर्वाधिक चर्चा एटीएस कमांडोंचीच होतेय. उत्तरप्रदेश सरकारने 2007 मध्ये एटीएसची स्थापना केली होती. ऑपरेशन टीम आणि फील्ड युनिट्सना अचूक अणि आवश्यक सहाय्य पुरविण्यासाठी अन्य विशेष युनिट्स सध्या एटीएस मुख्यालयात कार्यरत आहेत. दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता असलेल्या ठिकाणी एटीएस कमांडोंना तैनात केले जात असते. याचबरोबर व्हीव्हीआयपी व्यक्तींच्या सुरक्षेकरताही एटीएस कमांडो तैनात केले जात असतात.

उच्चस्तरीय सायबर तज्ञपथक

राम मंदिराच्या उद्घाटनापूर्वी सायबर धोक्यांना सामोरे जाण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाने एक उच्चस्तरीय सायबर तज्ञांची टीम अयोध्येत पाठविली आहे. या टीममध्ये केंद्रीय गृह मंत्रालयाचे 14  सदस्य, एमईआयटीवाय अधिकारी,  आयबी, सीईआरटी-आयएनचे अधिकारी आणि सायबर विषयक तज्ञांचा समावेश आहे.

प्रशिक्षित पोलिसांची निवड

प्रयागराज कुंभप्रमाणे अयोध्येतही प्रशिक्षित पोलीस कर्मचाऱ्यांना तैनात करण्यात आले आहे. देशभरातून येणाऱ्या भाविकांना भाषेची अडचण येऊ नये म्हणून विविध भाषा बोलणाऱ्या आणि समजणाऱ्या 21 आयपीएस अधिकाऱ्यांना तैनात करण्यात आले आहे. तसेच प्रमुख स्थळांवर साध्या वेशातील पोलिसांना तैनात करण्यात आले आहे. महनीय अतिथींच्या सुरक्षेकरता 288 पोलीस तैनात केले जातील.

राखीव दलाच्या 16 तुकड्या तैनात

प्राणप्रतिष्ठा सोहळ्याकरता 11 हजारांहून अधिक पोलीस कर्मचाऱ्यांना तैनात करण्यात आले आहे. अयोध्येत राखीव दलाच्या 16 तुकड्या तैनात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अयोध्येत येणाऱ्या सर्व मार्गांना ग्रीन कॉरिडॉरच्या स्वरुपात विकसित करत सुरक्षा पुरविण्यात आली आहे. अचूक सुरक्षा व्यवस्थेसाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या सुरक्षा यंत्रणांनी मिळून 7 स्तरीय सुरक्षाव्यवस्थेचा आराखडा तयार केला आहे. पहिल्या स्तरात एसपीजी कमांडो असणार आहेत. दुसऱ्या स्तरात एनएसजी जवान तर तिसऱ्या स्तरावर आयपीएस अधिकारी सुरक्षेची जबाबदारी सांभाळणार आहेत. चौथ्या स्तराची जबाबदारी सीआरपीएफच्या जवानांकडे असणार आहे. पाचव्या स्तरामध्ये उत्तरप्रदेश एटीएसचे कमांडो असतील, जे कुठल्याही संशयास्पद स्थितीत कारवाई करण्यास सज्ज असतील. सहाव्या स्तरात आयबी तर सातव्या स्तरावर स्थानिक पोलीस जवान तैनात असणार आहेत.

ड्रोनद्वारे देखरेख

एआयच्या माध्यमातून अयोध्येत येणाऱ्या सर्व लोकांच्या हालचालींवर करडी नजर ठेवली जात आहे. अयोध्येत एका ठिकाणी वारंवार ये-जा करणाऱ्या व्यक्तींची ओळख पटविण्यात येत आहे. अयोध्येत अत्याधुनिक सुरक्षा उपकरणे उपलब्ध करविण्यासाठी 90 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. यातून स्कॅनर, ड्रोन आणि इतर उपकरणांची खरेदी करण्यात आली आहे.

Advertisement
Tags :

.