For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

अमेरिकेतील 500 हिंदू मंदिरांना सुरक्षा कवच

06:22 AM Oct 26, 2026 IST | Tarun Bharat Portal
अमेरिकेतील 500 हिंदू मंदिरांना सुरक्षा कवच
Advertisement

मंदिरांच्या सुरक्षेसाठी 100 कोटीचा निधी : सीसीटीव्ही, अलार्म अन् सशस्त्र सुरक्षारक्षक तैनात करणार

Advertisement

अमेरिकेत दिवाळीच्या पार्श्वभूमीवर हिंदू मंदिरांच्या सुरक्षेत वाढ करण्याची तयारी सुरू झाली आहे. देशातील सुमारे 500 हिंदू मंदिरांसह धार्मिक संस्थांच्या सुरक्षेसाठी जवळपास 100 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करण्याची योजना आखण्यात आली आहे. इलिनॉय प्रांतातील एका हिंदू मंदिरावर हल्ल्याचा कट उघडकीस आल्यानंतर हा विषय ऐरणीवर आला आहे. मंदिरांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, सुरक्षा अलार्म आणि प्रशिक्षित सुरक्षारक्षक तैनात करण्यासह आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी स्थानिक पोलिसांशी समन्वय साधण्यावर भर दिला जाणार आहे.

वृत्तसंस्था, वॉशिंग्टन

Advertisement

इलिनॉय प्रांतात 19 वर्षीय अलेक्झांड्रोस पापोराकिस याच्यावर हिंदू मंदिरावर हल्ल्याचा कट रचल्याचा आरोप करण्यात आला आहे. नवरात्रीच्या काळात भारतीय वंशाच्या नागरिकांना लक्ष्य करण्याची योजना आखल्याचा आरोप त्याच्यावर आहे. या प्रकरणात पोलिसांनी त्याला अटक केली होती.

पापोराकिस हा आपल्या घरापासून सुमारे 65 किलोमीटर वाहन चालवत ऑरोरा येथील श्री वेंकटेश्वर स्वामी मंदिरात पोहोचला होता. सुटीच्या दिवशी या मंदिरात 3000 हून अधिक भाविक येतात. पापोराकिस हा रायफल आणि शेकडो काडतुसांसह तेथे पोहोचला होता. मात्र, रायफलमध्ये बिघाड झाल्याने त्याला गोळीबार करता आला नव्हता. या प्रकरणामळे मंदिरांच्या सुरक्षेबाबत चिंता वाढली आहे.

मंदिरांवरील हल्ले अन् तोडफोडीच्या घटना

अमेरिकेत गेल्या तीन वर्षांत हिंदू मंदिरांमध्ये तोडफोडीच्या सुमारे 25 घटना घडल्या आहेत. काही घटनांमध्ये मंदिरांच्या भिंतींवर भारतविरोधी घोषणा लिहिण्यात आल्या होत्या. न्यूयॉर्कमधील मेलव्हिल, सॅक्रामेंटो, यूटा आणि मिशिगन येथील मंदिरांमध्येही तोडफोडीच्या घटना घडल्या आहेत. भारतीय वंशाच्या नागरिकांविरोधातील द्वेषपूर्ण गुन्हे, ऑनलाइन ट्रोलिंग आणि समाजमाध्यमांवरील द्वेषपूर्ण संदेशांबाबतही चिंता व्यक्त होतेय. अमेरिकेतील राजकीय वातावरणात एच-1बी व्हिसा आणि स्थलांतराशी संबंधित चर्चांमध्ये हा विषय अधिक संवेदनशील ठरला आहे.

मंदिरांच्या सुरक्षेत तीन प्रमुख बदल

1 सीसीटीव्ही अन् सुरक्षा अलार्म : मंदिरांच्या परिसरात आधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे आणि धोक्याची सूचना देणारी अलार्म यंत्रणा बसविण्यावरही भर दिला जाणार आहे. तपासासाटी आवश्यक ठरावे म्हणून सीसीटीव्ही चित्रण 6 महिन्यांपर्यंत जतन करण्याची व्यवस्थाही प्रस्तावित आहे.

2 प्रशिक्षित सशस्त्र सुरक्षारक्षक : मोठ्या धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करणाऱ्या मंदिरांमध्ये प्रशिक्षित आणि परवानाधारक सशस्त्र सुरक्षारक्षक तैनात करण्याची तयारी आहे. काही मंदिर प्रशासनांकडून 24 तास सुरक्षा पुरविणाऱ्या संस्थांशी संपर्क साधला जात आहे.

3 पोलिसांशी समन्वय अन् आपत्कालीन नियोजन : मंदिर प्रशासनाला स्थानिक पोलिसांच्या संपर्कात राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. मोठ्या धार्मिक उत्सवांपूर्वी आपत्कालीन कृती आराखड तयार करून संभाव्य धोक्याच्या वेळी त्वरित प्रतिसाद देण्याची व्यवस्था केली जाणार आहे.

सुरक्षा मार्गदर्शक सूचना

हिंदू अमेरिकन फौंडेशनने (एचएएफ) मंदिर प्रशासन, धार्मिक कार्यक्रमांचे आयोजक आणि समुदायातील सदस्यांसाठी सुरक्षाविषयक मार्गदर्शक सूचना जारी केल्या ओत. मंदिरांवरील हल्ले आणि हिंदू समुदायाविरोधातील द्वेषपूर्ण घटनांबाबत संस्थेने चिंता व्यक्त केली आहे. इलिनॉयमधील घटनेमागे श्वेत वर्चस्ववादी कट्टरवादी असण्याची शक्यता संस्थेने व्यक्त केली आहे.

एफबीआय चौकशीची मागणी

इलिनॉयमधील मंदिरावर हल्ल्याचा कट रचल्याच्या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी 105 अमेरिकन खासदारांनी एफबीआयकडे मागणी केली आहे. राजा  कृष्णमूर्ती, प्रमिला जयपाल आणि रो खन्ना यांच्यासह अनेक खासदारांनी एफबीआय संचालक काश पटेल यांना पत्र लिहून मंदिरांवरील हल्ले आणि वाढत्या द्वेषपूर्ण गुन्ह्यांबाबत चिंता व्यक्त केली आहे.  या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी खासदारांनी केली आहे.

Advertisement
Tags :

.