महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

गुन्हेगारभोवती सुरक्षा कडे... उदंड झाले जुगारी अड्डे!

11:23 AM Jun 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

जुगारी अड्डेचालकांना पोलीस अधिकाऱ्यांची साथ : एकमेकांना संपविण्याचा घाट, शहरात पुन्हा एकदा टोळीयुद्धाचा धोका

Advertisement

बेळगाव : एखाद्या शहरातील पोलीस यंत्रणा कमकुवत ठरली किंवा स्वत:चे खिसे भरण्यात गुंतली तर त्या शहरातील गुन्हेगारीत साहजीकच वाढ होते. पोलीस यंत्रणेपेक्षा गुन्हेगार वरचढ ठरतात. चोऱ्या, घरफोड्या, वाटमारी आदी घटना वाढतात. सध्या बेळगावातही याहून वेगळी परिस्थिती नाही. जुगारी अड्डे उदंड झाले आहेत.अड्डेचालकांमध्ये जणू स्पर्धाच लागली असून ही स्पर्धा एकमेकाला संपविण्यापर्यंत पोहोचली आहे. मटका, जुगारी अड्डेचालक आर्थिक पाठबळावर संपूर्ण व्यवस्थेवर कसे नियंत्रण ठेवतात? हे सध्या बेळगावात पहायला मिळते आहे. चार-पाच महिन्यांपूर्वी मटका व जुगारी अड्ड्यांवर बेळगाव पोलिसांचे घातले जाणारे छापे अचानक कमी झाले आहेत.यंत्रणेला हाताशी धरल्यानंतरही लपूनछपून चालणारा व्यवहार आता राजरोसपणे सुरू झाला आहे. बेळगाव परिसरातील जुगारी अड्ड्यांवर रोज मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाली सुरू आहेत.

Advertisement

पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बन्यांग यांची या गैरधंद्यांविषयी कनिष्ठ अधिकारी दिशाभूल करीत आहेत की काय? असा संशय निर्माण झाला आहे. जुगारी अड्डे चालवण्याच्या चढाओढीतून गेल्या आठवड्यात चाकू हल्ल्याची घटना घडली. या घटनेनंतर मटका, जुगारी अड्डेचालकांवर काही अधिकाऱ्यांची किती मेहरनजर आहे? याचे प्रत्यंतर आले. मटका व जुगारी अड्ड्यांच्या नादी लागलेले अनेक सर्वसामान्य नागरिक कफल्लक बनले आहेत. पोलिसांची मर्जी कोणावर जास्त? यावर अड्डेचालकात चढाओढ सुरू झाली आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या हल्ल्यानंतर दोन दिवस धंदा बंद ठेवण्याचा सल्ला एका पोलीस अधिकाऱ्याने अड्डेचालकांना दिला होता. आता परिस्थिती निवळल्यानंतर हे अड्डे पुन्हा जोमाने सुरू झाले आहेत. काही जणांनी आपल्या पूर्वीच्या ठिकाणात बदल करून नव्या जागेवर अड्डे थाटले आहेत.

उपलब्ध माहितीनुसार बॉक्साईट रोड-कुमारस्वामी ले-आऊट परिसर व मार्केट यार्डला लागूनच दोन मोठे अड्डे सुरू झाले आहेत. तर कंग्राळी खुर्दजवळील मार्कंडेय नदीकाठावर सुरू असलेल्या अंदर-बाहर अड्ड्यांवरही जुगाऱ्यांची वर्दळ वाढली आहे. खासकरून शेतवडीत अड्डे सुरू आहेत. बेनकनहळ्ळी परिसरातील एका शेडमध्येही अंदर-बाहर जुगार सुरू असून बाची व महाराष्ट्राच्या हद्दीतील शिनोळीजवळ सुरू असलेला अड्डा आता काकतीजवळ हलविण्यात आला आहे.

बेळगाव परिसरातील काही तरुणांनी हलगा-बस्तवाडजवळ जुगारी अड्डा थाटला आहे. यरमाळ रोडवरील शेतवडीत रोज अंदर-बाहर जुगार रंगतो आहे. यापैकी काही अड्डेचालकांना पोलीस अधिकाऱ्यांबरोबरच राजकीय वरदहस्तही लाभला आहे. या प्रमुख जुगारी अड्ड्यांवर मोठ्या प्रमाणात उलाढाल सुरू आहे.एका अड्ड्यावरील जुगारी दुसऱ्या दिवशी किंवा दुसऱ्या आठवड्यात दुसऱ्या अड्ड्यावर गेल्यानंतर अड्डेचालकांमध्ये संघर्ष सुरू झाला आहे. गेल्या आठवड्यात झालेला हल्लाही अशा संघर्षातूनच झाल्याची माहिती मिळाली असून या घटनेमागचे खरे कारण उघडकीस आले तर आपलेही पितळ उघडे पडणार म्हणून पोलीस अधिकाऱ्यांनीच या प्रकरणाला वेगळी दिशा देण्याचे प्रयत्न केले आहेत.

जुगारी अड्डेचालकांकडून सामाजिक शांततेला सुरुंग

बेळगावातील गैरधंद्यांचा पूर्वेतिहास लक्षात घेता मटका व जुगारी अड्डेचालकांनी सामाजिक शांततेला अनेकवेळा सुरुंग लावल्याचीही उदाहरणे आहेत. आपल्या धंद्यावर ज्या ज्यावेळी नियंत्रण येते त्यावेळी दंगली घडवल्या गेल्या आहेत. याउलट काही मटकाचालकांनी ‘सबका मालिक एक’ म्हणून सर्वधर्म सलोख्याचा मार्गही अनुसरला होता. मात्र, ज्याप्रमाणे विघातक घटनेतून काहीच चांगले घडत नाही त्याप्रमाणे अड्डेचालकांमुळे समाजाला नुकसानच सोसावे लागले आहे. प्रत्यक्षात मटका व जुगारी अड्डा चालवणारे समाजात मात्र समाजसेवकाचा बुरखा घालून समाजसेवेचा व्रत घेतल्याचा बनाव करतात. वर्षानुवर्षे या अड्डेचालकांबरोबर संधान बांधलेले काही अधिकारी व पोलीस वेळोवेळी त्यांना माहिती पुरवत राहतात. त्यामुळे पोलीस दलातील इत्यंभूत माहिती कसलेल्या खबऱ्याप्रमाणे पोलिसांकडूनच अड्डेचालकांना मिळत असते. त्यामुळे पुन्हा एकदा शहराच्या शांततेला सुरुंग लागणार की काय? अशी भीती निर्माण झाली आहे.

कारवाई होणारच!

यासंबंधी पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बन्यांग यांच्याशी संपर्क साधला असता आपल्याला परिस्थितीची कल्पना आली असून बेळगाव परिसरात सुरू असलेल्या मटका, जुगाराबरोबरच गैरधंदे थोपविण्यासाठी आपण अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत. बैठकीत आढावा घेऊन परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. लवकरच गैरधंदेचालकांविरुद्ध मोहीम उघडण्यात येणार आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article