For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

विश्वेश नायकच्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळवून द्या

09:35 AM Oct 02, 2026 IST | Tarun Bharat Portal
विश्वेश नायकच्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळवून द्या
Advertisement

नगरपंचायतीच्या कारभाराची चौकशी करा : मच्छे ग्रामस्थांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

Advertisement

बेळगाव : मच्छे येथील तलावात गणेश विसर्जनप्रसंगी बुडून मृत्यू झालेल्या तरुणाच्या कुटुंबाला सरकारने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी मच्छे ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आली आहे. ग्रामस्थांनी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर जाऊन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. शिरस्तेदार एस. एम. परगी यांनी निवेदनाचा स्वीकार केला. मच्छे येथील मुख्य तलावावर गणेश विसर्जनासाठी मोठी गर्दी झाली होती. यावेळी विश्वेश विनोद नायक या तरुणाचा बुडून मृत्यू झाला. या घटनेमुळे नायक कुटुंबावर मोठे संकट ओढवले आहे. या प्रकरणाची चौकशी करून कुटुंबाला आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी निर्देश द्यावेत, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

निवेदन देताना अमोल लाड, अमर गोरल, सागर जैनोजी, प्रशांत जाधव, विशाल जैनोजी, जोतिबा कणबरकर, उदय जाधव, संभाजी कणबरकर, रवी सागलेकर उपस्थित होते. मच्छे येथील मुख्य तलावावर श्रीमूर्ती विसर्जनासाठी हजारो भाविक उपस्थित होते. तेथे अग्निशमन दल, जीवरक्षक, वैद्यकीय सुविधा, रुग्णवाहिका यासारख्या  सुविधा नगरपंचायतीने केल्या नव्हत्या. गावात मागील दोन वर्षांपूर्वी कृत्रिम तलाव बांधून तेथे गणेश विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र यंदा कृत्रिम तलाव तयार करण्यात आला नव्हता. त्यामुळे मुख्य तलावावर भाविकांची मोठी गर्दी झाली होती. भाविकांच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने नगरपंचायतीने उपाययोजना का केल्या नाहीत याची नि:पक्षपणे चौकशी व्हावी, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.