मिर्झापूर चित्रपटात ‘सचिवजी’ची एंट्री
मिर्झापूर या लोकप्रिय सीरिजची कहाणी आता चित्रपटाद्वारे मांडली जाणार आहे. या चित्रपटात आता ‘पंचायत’मधील सचिवजी म्हणजेच जितेंद्र कुमारही दिसून येणार आहे. मिर्झापूर सीरिजमध्ये अली फजल आणि विक्रांत मैसी हे मुख्य भूमिकेत दिसून आले होते. तर आता विक्रांत मैसी हा मिर्झापूर चित्रपटात काम करणार नसल्याचे समोर आले आहे. विक्रांतच्या जागी जितेंद्र कुमार दिसून येणार आहे. जितेंद्रला पंचायत सीरिजद्वारे मोठी लोकप्रियता मिळाली आहे. या लोकप्रियतेचा लाभ घेण्याचा प्रयत्न मिर्झापूर चित्रपटाचे निर्माते करणार आहेत. जितेंद्र कुमार हा या चित्रपटात बबलू पंडित ही भूमिका साकारणार आहे. मिर्झापूर चित्रपटाचे चित्रिकरण मुंबई आणि वाराणसीत होणार आहे. तर राजस्थानातील वाळवंटातही याचे चित्रिकरण पार पडणार असून यात जोधपूर आणि जैसलमेर या शहरांची निवड केली जाण्याची शक्यता आहे. तसेच चित्रपटातील मुख्य नायिकेची अद्याप निवड झालेली नाही. चित्रपटात सोनम बाजवा किंवा सोनल चौहानची वर्णी लागण्याची शक्यता आहे.