केंद्रीय पर्यावरण मंत्रालय समिती पाहणीबाबत गुप्तता
समितीच्या पाहणीचे वेळापत्रक जाहीर न केल्याने संशय : सभापती, आमदार, मंत्र्यांनाही दिली नाही माहिती
पणजी : पश्चिम घाट जैव संवेदनशील भागातून वगळण्याची मागणी होत असलेल्या राज्यातील 21 गावांना गोव्यात पाहणीसाठी आलेली केंद्रीय पर्यावरण मंत्रालय समिती केव्हा भेट देणार याची वेळ, दिवस यासंदर्भातील माहिती उघड केलेली नाही. त्याशिवाय कोणत्या गावांना समितीने भेटी दिल्या याची माहितीही जाहीर केली जात नसल्याने गावातील लोक संशय व्यक्त करत आहे. समितीने कोणत्या गावांना कधी (दिवस, वेळ, कुठे) भेट देणार याची माहिती अगोदर जाहीर करणे आवश्यक होते. ती माहिती संबंधित गावातील ग्रामस्थांना अगोदर कळायला हवी होती. परंतु तसे काहीच झाले नाही. ते जर अगोदर कळाले असते तर गावातील ग्रामस्थांना त्याबाबतीत तक्रारी, गाऱ्हाणी समितीसमोर मांडता आली असती, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
ही समिती आपल्या गावात कधी येऊन गेली याचा कोणालाच पत्ता नसल्याचे दिसून आले आहे. सभापती रमेश तवडकर तसेच सांगेचे आमदार व मंत्री सुभाष फळदेसाई यांनी देखील समिती त्यांच्या गावात कधी येणार हे कळवण्यात आले नसल्याबद्दल खंत वर्तवली आहे. या समितीने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, पर्यावरणमंत्री आलेक्स सिक्वेरा यांची भेट घेतल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. त्यांच्यात बैठकही झाल्याचे सांगण्यात आले. 21 गावे वगळण्याचा प्रस्ताव कितपत योग्य आहे यावर विचारमंथन करुन तपासणी होऊन अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचे सूत्रांनी नमूद केले. वगळण्याची मागणी होणाऱ्या 21 गावांमध्ये सत्तरी तालुक्यातील 12, धारबांदोडा तालुक्यातील 5, सांगेमधील 3 व काणकोणमधील एका गावाचा समावेश आहे. आमदार दिव्या राणे, गणेश गांवकर यांनी देखील त्यांच्या भागात येणारी वरील गावे वगळावीत अशी मागणी केली आहे.