For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

दुसरी अनधिकृत कसोटी अखेर अनिर्णीत

06:51 AM Nov 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
दुसरी अनधिकृत कसोटी अखेर अनिर्णीत
Advertisement

यशस्वी जैस्वालला सापडला फलंदाजीचा सूर, यश राठोडचेही नाबाद शतक

Advertisement

वृत्तसंस्था, ख्राईस्टचर्च

भारत अ आणि न्यूझीलंड अ यांच्यातल चार दिवसांची दुसरी अनधिकृत कसोटी मंगळवारी खेळाच्या शेवटच्या दिवशी अनिर्णीत अवस्थेत संपली. मात्र या सामन्यात भारताचा सलामीचा धडाकेबाज फलंदाज यशस्वी जैस्वालला फलंदाजीचा सूर आगामी कसोटी मालिकेपूर्वी सापडला. या अनिर्णीत सामन्यात जैस्वालने नाबाद दीड शतक झळकविले.

Advertisement

या सामन्यात भारत अ ने पहिल्या डावात 346 धावा जमविल्यानंतर न्यूझीलंड अ संघाने पहिल्या डावात 424 धावांचा डोंगर उभा केला. न्यूझीलंड अ ने पहिल्या डावात 78 धावांची आघाडी मिळविली. भारत अ ने बिनबाद 32 या धावसंख्येवरून मंगळवारी शेवटच्या दिवशीच्या खेळाला पुढे प्रारंभ केला आणि 52.4 षटकांत त्यांनी 2 बाद 282 धावा जमविल्या. सलामीचा यशस्वी जैस्वाल आणि यश राठोड या जोडीने तिसऱ्या गड्यासाठी अभेद्य 247 धावांची द्विशतकी भागिदारी केली.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात दोन सामन्यांच्या कसोटी मालिका खेळविली जाणार आहे. या मालिकेपूर्वी सलामीचा फलंदाज यशस्वी जैस्वालला सूर मिळाल्याने प्रमुख प्रशिक्षकाची चिंता थोडीफार दूर झाली आहे. जैस्वालला या न्यूझीलंडच्या दौऱ्यामध्ये गेल्या तीन डावांमध्ये अधिक धावा जमविता आल्या नाहीत. त्याने या मालिकेत 17, 5 आणि 0 अशा धावा जमविल्या होत्या. तसेच रणजी क्रिकेट स्पर्धेतील चंदीगडविरुद्धच्या सामन्यातही त्याला खाते उघडता आले नव्हते.

यशस्वी जैस्वालने न्यूझीलंड अ संघाच्या गोलंदाजीसमोर आक्रमक फलंदाजी करताना 5 षटकार आणि 15 चौकारांसह 162 चेंडूत नाबाद 155 धावा झोडपल्या. तर विदर्भचा डावखुरा फलंदाज यश राठोडने 122 चेंडूत 9 चौकारांसह नाबाद 100 धावा जमविल्या. राठोडचे शतक पूर्ण झाल्यानंतर दोन्ही संघांच्या कप्तानांनी खेळ थांबविण्याचा निर्णय घेतला. शेवटच्या दिवशी 44 षटकांचा खेळ झाला. भारत अ च्या दुसऱ्या डावामध्ये साई सुदर्शन 11 धावांवर बाद झाला तर देवदत्त पडिक्कलला खाते उघडता आले नाही. ओव्हलची खेळपट्टी फलंदाजीस अनुकूल ठरत असल्याचे दिसून आले. जैस्वाल आणि राठोड यांनी आरामात फटकेबाजी केली. जैस्वालचे प्रथमश्रेणी क्रिकेटमधील हे 17 वे शतक आहे. राठोडने यामालिकेतील पहिल्या सामन्यात पहिल्या डावात 44 तर दुसऱ्या डावात 66 धावा जमविल्या होत्या. राठोडचे विदेशातील भूमीवरील हे पहिलेच शतक आहे. जैस्वालने न्यूझीलंड अ संघातील गोलंदाज क्लार्क आणि मॅके तसेच रँडलच्या गोलंदाजीवर कव्हरड्राईव्ह आणि पूलचे अप्रतिम चौकार तसेच उत्तुंग षटकारही खेचले. त्याने फॉक्सक्रॉप्टच्या गोलंदाजीवर चार षटकार ठोकले. न्यूझीलंड आणि भारत यांच्यातील दोन सामन्यांची कसोटी मालिका 19 नोव्हेंबरपासून खेळविली जाणार आहे.

संक्षिप्त धावफलक: भारत अ प. डाव 346, न्यूझीलंड अ प. डाव 424, भारत दु. डाव 52.4 षटकांत 2 बाद 282 (यशस्वी जैस्वाल नाबाद 155, यश राठोड नाबाद 100, साई सुदर्शन 11, पडिक्कल 0).

Advertisement
Tags :

.