दुसरी कसोटी आजपासून, बेन स्टोक्सचे पुनरागमन
वृत्तसंस्था / मुल्तान
येथे मंगळवारपासून सुरू होणाऱ्या यजमान पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटीत इंग्लंडचा नियमीत कर्णधार बेन स्टोक्सचे पुनरागमन होणार आहे. तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत इंग्लंडने पहिली कसोटी जिंकून पाकवर 1-0 अशी आघाडी यापूर्वीच घेतली आहे.
गेल्या ऑगस्ट महिन्यात स्टोक्सला दुखापत झाली होती. या दुखापतीमुळे त्याला किमान दोन महिने क्रिकेटपासून अलिप्त रहावे लागले. पाक विरुद्धच्या कसोटी मालिकेत स्टोक्सला पहिल्या सामन्यात या समस्येमुळे खेळता आले नव्हते. स्टोक्सची ही दुखापत आता पूर्णपणे बरी झाली असून तो मंगळवारपासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटीसाठी पूर्ण तंदुरुस्त असल्याचे इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाच्या प्रवक्त्याने सांगितले.
या मालिकेतील पहिल्या सामन्यात इंग्लंडने पाकिस्तानचा एक डाव आणि 47 धावांनी दणदणीत पराभव केला होता. इंग्लंडने या सामन्यात 800 धावांचा टप्प ओलांडला होता. दुसऱ्या कसोटीसाठी इंग्लंड संघामध्ये वेगवान गोलंदाज मॅथ्यु पॉटसचा समावेश करण्यात आला आहे. मात्र अॅटकिनसनला वगळण्यात आले आहे. ख्रिस वोक्सच्या जागी स्टोक्सचा संघात समावेश झाला आहे. मात्र या दुसऱ्या कसोटीसाठी अंतिम 11 खेळाडूंमध्ये फिरकी गोलंदाज शोएब बशीर आणि जॅक लिच यांनी आपले स्थान राखले आहे. 33 वर्षीय अष्टपैलु स्टोक्सला ऑगस्टमध्ये झालेल्या द हंड्रेड या स्पर्धेत खेळताना स्नायु दुखापत झाली होती. या दुखापतीमुळे त्याला इंग्लंडमध्ये झालेल्या लंकेविरुद्धची तीन सामन्यांच्या मालिकेला मुकावे लागले. या दुसऱ्या कसोटीसाठी पाकचा संघ अद्याप जाहीर झालेला नाही. पण माजी कर्णधार बाबर आझम, शाहीन आफ्रिदी व नसीम शहा यांना डच्चू देण्यात आला आहे. तसेच सर्फराज अहम्मदलाही संघातून मोकळीक दिली आहे.
इंग्लंड संघ: स्टोक्स (कर्णधार), क्रॉले, डकेट, ऑली पोप, रुट, ब्रुक, जेमी स्मिथ, कार्से, पॉटस्, लिच आणि शोएब बशीर