सलग दुसरे सत्रही तेजीसोबत बंद
सेन्सेक्स व निफ्टी निर्देशांक मजबूत : अंतिम सत्राचा समारोप उत्साहात
वृत्तसंस्था / मुंबई
भारतीय भांडवली बाजारात चालू आठवड्यातील अंतिम सत्रात शुक्रवारी बीएसई सेन्सेक्स व एनएसई निफ्टी यांचे निर्देशांक हे वधारुन बंद झाले आहेत. या अगोदरच्या दिवशी भारतीय बाजारात मोठ्या प्रमाणात चढउताराची स्थिती निर्माण झाली होती. मात्र या स्थितीतही बाजार मजबूत राहिला होता. शुक्रवारच्या सत्रात बीएसई मिडकॅप व स्मॉलकॅप यांचे निर्देशांक एक टक्क्यांच्या तेजीने बंद झाले.
प्रमुख कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 253.31 अंकांनी वधारुन निर्देशांक 73,917.03 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा दिवसअखेर 62.25 अंकाच्या तेजीसोबत निर्देशांक 0.28 टक्क्यांसोबत 22,466.10 वर बंद झाला आहे.
आज बाजार राहणार सुरु
बेंचमार्क निर्देशांक आल्यामुळे आज शनिवार रोजी विशेष ट्रेडिंग सत्र सुरु राहणार असल्याची माहिती शेअर बाजाराने दिली आहे. यामध्ये एनएसई ट्रेडिंग दरम्यान येणाऱ्या अनावश्यक अडथळ्यांना तोंड देण्यासाठीची चाचणी यामधून घेण्यात येणार असल्याची माहिती आहे. यात दोन सत्र राहणार असून यात सकाळी 9.15 ला सुरु होणार आणि 10 वाजेपर्यंत सुरु राहणार आहे. तर दुसरे सत्र 11.45 ला सुरु होत दुपारी 1 पर्यंत सुरु राहणार आहे.
प्रमुख कंपन्यांमध्ये शुक्रवारी महिंद्रा अॅण्ड महिंद्रा यांचे समभाग 5.97 टक्क्यांनी वधारले आहेत. तर जेएसडब्ल्यू स्टील, अल्ट्राटेक सिमेंट, कोटक बँक, आयटीसी आणि एनटीपीसी यांचे समभागही वधारले. तर रिलायन्स इंडस्ट्रीजचे समभाग हे 0.73 टक्क्यांनी मजबुतीसह बंद झाले. अन्य कंपन्यांमध्ये टीसीएस, एचसीएल टेक, हिंदुस्थान युनिलिव्हर, नेस्ले, बजाज फिनसर्व्ह, विप्रो आणि इन्फोसिस यांचे समभाग हे नुकसानीसह बंद झाले.
अन्य घडामोडींमध्ये शुक्रवारी मिळताजुळता कल राहिला आणि अमेरिकन पेडरल रिझर्व्हच्या अनिश्चित निर्णयामुळे बाजारात तेजी पुन्हा परतल्याचे दिसून आले.