एमबीबीएस, बीडीएस प्रवेशाची आज दुसरी फेरी
पणजी : एमबीबीएस-बीडीएस या अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी आज सोमवारी सकाळी 10 वाजल्यापासून पर्वरी येथील तांत्रिक शिक्षण संचालनालय सभागृहात प्रवेशासाठी दुसरी फेरी होणार आहे. एमबीबीएसच्या जागा वाढवण्यात आल्यामुळे अतिरिक्त जागा आजच्या फेरीत भरल्या जाणार आहेत.
प्रथम वर्ष वैद्यकीय पदवी अभ्यासक्रम (एमबीबीएस) 180 वऊन 200 पर्यंत जागा वाढवल्या आहेत. राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने त्यास मान्यता दिल्यामुळे आणखी 20 जणांना प्रवेशाची संधी लाभणार आहे. मागील फेरीत एमबीबीएस, बीडीएस सर्व जागा भरल्या होत्या. त्यावेळी काही उमेदवारांना एमबीबीएसमध्ये प्रवेश मिळाला नाही म्हणून त्यांनी बीडीएससाठी प्रवेश घेतला होता.
आज सोमवारी एमबीबीएस, बीडीएस सोबत आयुर्वेदिक तसेच बीएससी नर्सिंगसाठी देखील प्रवेश प्रक्रिया होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्याशिवाय 17 सप्टेंबर (मंगळवारी), 18 सप्टेंबर (बुधवारी), पशुवैद्यकीय अभ्यासक्रम तसेच आयुर्वेदिक बीएससी (नर्सिंग)साठी देखील पुन्हा प्रवेश फेरी घेतली जाणार असल्याची माहिती देण्यात आली.