सा. कार्यकारी अभियंत्याच्या निवासस्थानावर लोकायुक्त अधिकाऱ्यांचा दुसऱ्यांदा छापा
सोने-चांदी, दुचाकी-चारचाकी, तीन घरांसह दीड कोटीची मालमत्ता उघड
बेळगाव : येथील पंचायतराज इंजिनिअरिंग विभागाचे साहाय्यक कार्यकारी अभियंते दुरदुंडेश्वर बन्नूर यांच्या येळ्ळूर येथील निवासस्थानावर छापा टाकून लोकायुक्त अधिकाऱ्यांनी गुरुवारी दिवसभर बेहिशेबी मालमत्तेसाठी शोध घेतला. येळ्ळूर व विनायकनगर येथील दुरदुंडेश्वर यांचा मुलगा वैभव याच्या घरासह दोन ठिकाणी गुरुवारी रात्री उशिरापर्यंत शोधमोहीम सुरू होती. लोकायुक्त पोलीसप्रमुख हणमंत राय यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक भरत रेड्डी, निरंजन पाटील व इतर अधिकाऱ्यांनी या कारवाईत भाग घेतला. परमेश्वरनगर-येळ्ळूर येथील निवासस्थानी गुरुवारी सकाळी छापा टाकण्यात आला. लोकायुक्तांनी दुरदुंडेश्वर बन्नूर यांच्यावर केलेली तीन महिन्यांतील ही दुसरी कारवाई आहे.
लोकायुक्त आयुक्त अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी सायंकाळपर्यंत केलेल्या तपासणीत 260.87 ग्रॅम सोने, 1 किलो 63 ग्रॅम चांदी, 1 लाख 84 हजार रुपये रोकड, दोन दुचाकी, कार, तीन घरे असा एकूण एक कोटीहून अधिक उत्पन्न स्रोतापेक्षा जास्त असलेले घबाड उघडकीस आले आहे. यासंबंधी लोकायुक्त पोलीसप्रमुख हणमंत राय यांच्याशी संपर्क साधला असता कारवाई अद्याप सुरू आहे. ती पूर्ण होईपर्यंत निश्चित माहिती देता येणार नाही, असे त्यांनी सांगितले. होनगा, गोकाक येथेही त्यांची मालमत्ता असल्याचे आढळून आले आहे.
येळ्ळूर येथील बंगल्यापाठोपाठ विजयनगर येथेही अधिकाऱ्यांनी तपासणी केली. गुरुवारी कर्नाटकातील नऊ जिल्ह्यातील 11 अधिकाऱ्यांसंबंधीच्या 56 ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. यामध्ये दुरदुंडेश्वर बन्नूर यांचाही समावेश आहे. याबरोबरच निर्मिती केंद्राचे शेखरगौडा कुंदरगी यांच्या दोन घरांवरही लोकायुक्तांनी छापा टाकला आहे. दि. 26 मार्च 2024 रोजी मनरेगा योजनेतील कामांना तांत्रिक अनुमोदन देण्यासाठी एका ग्राम पंचायत सदस्याकडून दहा हजाराची लाच स्वीकारताना दुरदुंडेश्वर बन्नूर यांना रंगेहाथ पकडण्यात आले होते. त्यानंतर केवळ तीन महिन्यांत त्यांच्या घरावर छापा टाकण्यात आला आहे.
यापूर्वीच्या छाप्यात 28 लाखांचे घबाड
खानापूर येथे लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक केल्यानंतर लोकायुक्त पोलीस उपअधीक्षक पुष्पलता, पोलीस निरीक्षक निरंजन पाटील, रवी मावरकर, राजश्री भोसले, अभिजीत जमखंडी, एन. एम. मठद आदींचा समावेश असलेल्या पथकाने परमेश्वरनगर-येळ्ळूर येथील निवासस्थानी तपासणी केली असता 27 लाख 75 हजार रुपये रोकड सापडली होती. या पैशांविषयी कसलीच कागदपत्रे आढळून आली नव्हती. त्यानंतर गुरुवारी अधिकाऱ्यांनी छापा टाकला आहे.