For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

दुसरी बैठकही निर्णयाविनाच

07:40 AM Oct 27, 2026 IST | Tarun Bharat Portal
दुसरी बैठकही निर्णयाविनाच
Advertisement

सर्किट हाऊसवर मुख्यमंत्र्यांची मध्यरात्री 12.30 पर्यंत बैठक

Advertisement

त. भा. प्रतिनिधी

बेळगाव : या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार म्हणाले, मी सकाळी 11 वाजल्यापासून बैठका घेतल्या आहेत. दराची कोंडी फोडण्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न केले आहेत. 80 पैकी 79 कारखानदार, 9 मंत्री, 70 आमदार, अधिकारी बैठकीत सहभागी झाले होते. साखर कारखानदार आणि शेतकरी निर्णयाप्रत आले आहेत. ते पुन्हा आपापसात चर्चा करून दोन दिवसांत निर्णय घेतील अशी अपेक्षा आहे. शेतकऱ्यांनी केंद्रीय मंत्र्यांशीही चर्चा करण्यास तयारी दर्शविली आहे. मी देखील केंद्र सरकारशी चर्चा करून शेतकऱ्यांच्या हितासाठी कटिबद्ध आहे, असे त्यांनी सांगितले.

Advertisement

या बैठकीनंतर बोलताना शेतकरी नेते चुन्नाप्पा पुजारी यांनी, आम्ही केंद्रीय मंत्र्यांशी चर्चा केली असून त्यांनीही दरासंबंधी पुढाकार घेण्याची तयारी दर्शविली आहे. निर्णय होईपर्यंत आमचे आंदोलन सुरुच राहणार असल्याचे सांगितले.

बैठकीत साखर कारखानदारांनी ऊसाला प्रति टन 3,450 ते 3500 रुपयांपर्यंत दर देण्याची तयारी दर्शविल्याचे समजते. मात्र, शेतकरी संघटनांनी सहमती दर्शविली नाही. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे आंदोलन सुरुच राहणार असून पुढील दोन दिवसांत साखर कारखानदार आणि शेतकऱ्यांमध्ये होणाऱ्या चर्चेवर पुढील घडामोडी अवलंबून राहणार आहेत.

  मुख्यमंत्र्यांच्या बेळगाव दौऱ्याचे वेळापत्रक कोलमडले

ऊसउत्पादक शेतकऱ्यांच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या बेळगाव दौऱ्याचे वेळापत्रक कोलमडले. सुवर्ण विधानसौधमधील बैठक अनिर्णित झाल्याने तेथून थेट सर्किट हाऊसला येऊन मुख्यमंत्र्यांनी साखर कारखानदारांशी चर्चा सुरू केली आहे.

ही बैठक मध्यरात्री 12.30 पर्यंत चालली. नियोजित कार्यक्रमानुसार विशेष विमानाने बेंगळूरला न जाता मुख्यमंत्र्यांनी दुसऱ्या टप्प्याची बैठक हाती घेऊन शेतकऱ्यांबद्दलची आपली काळजी दाखवून दिली.

आंदोलन न करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

ऊसउत्पादक शेतकऱ्यांची बैठक आटोपती घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, आपण कारखानदार व शेतकऱ्यांशी चर्चा केली आहे. दोन्ही बाजू ऐकून घेतल्या आहेत. कारखाने सुरू करायला हवेत. वेळेत कारखाने सुरू झाले नाहीत तर शेतकऱ्यांच्या अडचणी वाढणार आहेत. महाराष्ट्रातील कारखान्यांनी गाळप सुरू केले आहे. पुन्हा कारखानदार व केंद्रीय मंत्र्यांशी चर्चा करावी लागणार आहे. अनेक वर्षांपासून तिढा सोडविण्यासाठी केंद्राला विश्वासात घ्यावे लागणार आहे. सरकार तुमच्यासोबत आहे. त्यामुळे आंदोलन करू नका, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

आज ठरणार पुढील आंदोलनाची रुपरेषा

ऊस दराच्या मुद्द्यावरून गुर्लापूर येथे शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच असून दराबाबत कोणताही तोडगा न निघाल्याने शशिकांत गुरुजींनी मंगळवारी ‘कर्नाटक बंद’ची हाक दिली होती. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सोमवारी मध्यरात्रीनंतरही साखर कारखान्यांसोबत बैठक सुरू होती. त्यामुळे शेतकरी नेत्यांनी राज्य सरकारला 48 तासांचा अल्टिमेटम दिला असून मंगळवारी सकाळपर्यंत कोणता निर्णय होईल, यावर शेतकरी नेते चर्चा करून दुपारी ‘बंद’ बाबत आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत.

Advertisement
Tags :

.