सांगलीत 29 रोजी दुसरे दीपस्तंभ साहित्य संमेलन
सांगली :
येथील दीपस्तंभ सांस्कृतिक संघाच्या रौप्य महोत्सवी वर्धापन दिनाच्या निमित्ताने सांगलीत दुसरे दीपस्तंभ साहित्य संमेलन 29 डिसेंबर रोजी होत असून या संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ विचारवंत आणि अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांची निवड करण्यात आली आहे. वैचारिक मेजवानी ठरणाऱ्या या साहित्य संमेलनात अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर तीन परिसंवाद आणि दोन काव्यसंमेलने होतील अशी माहिती संयोजक प्रा. डॉ. जगन कराडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
शनिवार 28 व रविवार दि. २९ रोजी सांगली कोल्हापूर रोडवरील संघाच्या बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन येथे क्रांतीसुर्य ज्योतिराव फुले साहित्य नगरीत हे संमेलन दोन दिवस होणार आहे. पहिल्या दिवशी पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम तर दुसऱ्या दिवशी प्रत्यक्ष साहित्य संमेलन होणार आहे. संमेलनाचे उद्धघाटक म्हणून मुंबई येथील प्रसिध्द साहित्यिक सचित तासगांवकर आणि स्वागताध्यक्ष म्हणून मुंबई येथील संजय भंडारे तसेच या उदघाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रा.डॉ. जगन कराडे हे उपस्थित रहाणार आहेत.
तीन परिसंवादांची वैचारिक मेजवानी
संमेलनाच्या पहिल्या सत्रात अनुसूचित जातीचे उपवर्गीकरण आणि त्याचे परिणाम या परिसंवादासाठी सेवा निवृत न्यायाधिश अनिल वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होत असून यामध्ये स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथील राजेंद्र गोणारकर, पुण्यातील एल. बी. एस. लॉ महाविद्यालयाचे प्राचार्य नितीश नवसागरे आणि भारती लॉ कॉलेज, सांगली मधील प्रा. संजीव साबळे हे सहभागी होत आहेत. दुस-या सत्रात आंबेडकरी समाजाचे भविष्यातील सामाजिक व आर्थीक प्रगतीचे मार्ग या विषयावर परिसंवादाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांच्या अध्यक्षतेखाली होत असुन गोखले कॉलेज, कोल्हापूरचे प्रा.डॉ. चंद्रकांत कुरणे तसेच शिवाजी विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. आलोक जत्राटकर सहभागी होत आहेत. तिसरे सत्र हे नवोदित कविंसाठी (काव्यगजरा) हे कवठेमहांकाळ येथील सुरेखा कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली व कवि गौतम कांबळे यांच्या संयोजनामध्ये होत आहे. पाचव्या सत्रात केवळ निमंत्रित कविंचे काव्यसंमेलन यवतमाळ येथील प्रा. अनिल काळबांडे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच आष्टा येथील कवि आनंदा हाबळे यांच्या संयोजनामध्ये होईल. यात बारा निमंत्रित कविंचा सहभाग असणार आहे. चौथे सत्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छ. संभाजीनगर येथील डॉ. उत्तमराव आंभोरे यांच्या अध्यक्षतेखाली आंबेडकरवाद वर्तमान परिप्रेक्षातून या विषयावर होणार असून या परिसंवादात सातारा येथील पार्थ पोळके तसेच सांगलीयेथील प्रा. कुलबीर कांबळे हे सहभागी होतील. साहित्य रसिकांनी सर्व कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घ्यावा असे संस्थेचे सचिव माजी उपप्राचार्य प्रा. पी. आर. कांबळे तसेच शुभांगी कांबळे, प्रमोद सारनाथ, सूर्यकांत कटकोळ, आर. टी. कुदळे, प्रा. रवींद्र ढाले, सुरेश माने यांनी आवाहन केले आहे.
यांचा होणार दीपस्तंभ पुरस्काराने गौरव
दीपस्तंभ संस्थेच्या रौप्य महोत्सवानिमित्त संमेलनाच्या आदल्या दिवशी 28 रोजी पुरोगामी विचाराने भरीव कार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना दीपस्तंभ सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. यामध्ये दीपस्तंभ जीवनगौरव पुरस्कारं सचित उर्फ यादवराव तासगांवकर, शैक्षणिक पुरस्कार डॉ. सुरज पवार, कोल्हापूर, सामाजिक पुरस्कार संजय भंडारे, मुंबई, सांस्कृतिक पुरस्कार डॉ. अरुण मिरजकर, रामजीबाबा संकपाळ पिता पुरस्कार तानाजी वाघमारे याशिवाय शैक्षणिक क्षेत्रात सर्वोच्च गुणवत्ता आणि उद्योग व्यवसायाच्या क्षेत्रात यश मिळवलेल्या दहा जणांचा सत्कार करण्यात येणार आहे.