भारतीय महिलांचा सलग दुसरा विजय,
एएफसी महिला आशियाई चषक पात्रता : तिमोर-लेस्टवर 4-0 फरकाने मात
वृत्तसंस्था/ चियांग माइ, थायलंड
एएफसी महिला आशियाई चषक 2026 पात्रता स्पर्धेतील सामन्यात भारतीय महिला संघाने तिमोर-लेस्ट संघाचा 4-0 असा एकतर्फी पराभव केला. विंगर मनीषा कल्याणने 12 व 80 व्या मिनिटाला असे दोन गोल नोंदवले तर अंजू तमंगने 50 व्या आणि लीन्डा कोम सेर्टोने 86 व्या भारताचे एकेक गोल केले. भारताने या सामन्यात प्रारंभापासूनच वर्चस्व राखले. मध्यंतराला भारताने 1-0 अशी आघाडी घेतली होती. या विजयानंतर भारताने गट ब मध्ये दोन्ही सामने जिंकत 6 गुणांसह आघाडीचे स्थान मिळविले आहे. इराक व थायलंड त्यांच्या मागे आहेत. पाच संघांच्या या गटात अग्रस्थान मिळविण्यासाठी चुरस लागणार आहे. पण सलग दोन विजय मिळविल्याने भारताला हे स्थान मिळविण्याची चांगली संधी आहे.
या स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात भारताने मंगोलियाचा 13-0 असा एकतर्फी धुव्वा उडविल्यानंतर हाच जोम दुसऱ्या सामन्यातही त्यांनी कायम ठेवत प्रारंभापासूनच तिमोर संघावर दडपण आणले आणि गोलच्या संधी निर्माण केल्या. सहाव्या मिनिटाला भारताला पहिली संधी मिळाली. तमंगने एका थ्रू बॉलवर ताबा घेतला. पण तिमोर लेस्टची गोलरक्षक गॉरेट दा कॉस्टाने तिचा प्रयत्न फोल ठरविला. मात्र लगेचच भारताला पहिले यश मिळाले. मनीषा व तमंग यांनी एकमेकांच्या प्रयत्नाने डावीकडून तिमोर लेस्टचा बचाव भेदत आगेकूच केली आणि तमंगने मनीषाला उत्कृष्ट पास पुरविला. तिने डाव्या पायाने जोरदार फटका लगावत हा गोल नोंदवला. प्यारी झाझाने ही आघाडी वाढवलीच होती. पण तिचा फटका बारला लागून बाहेर गेला. भारताच्या सतत होणाऱ्या आक्रमणामुळे तिमोर लेस्ट बचाव करण्यात मग्न होते. त्यांना आक्रमण करण्याची संधीच मिळत नव्हती.
उत्तरार्धात भारताने त्यात आणखी तीन गोलांची भर घातली. 58 व्या मिनिटाला संजूच्या क्रॉसवर तिमोर लेस्टच्या बॉक्स क्षेत्रात गोंधळ निर्माण झाला. गोलरक्षक दा कॉस्टाला चेंडूच्या उंचीचा अंदाज आला नाही. त्याचा लाभ घेत तमंगने अगदी जवळून हलकेच टॅप करीत गोल नोंदवत भारताचा दुसरा गोल केला. नंतर मनीषाने एका जोरदार फटक्यावर ही आघाडी 3-0 अशी केली आणि 86 व्या मिनिटाला ग्रेस दांगमेइने बॉक्स क्षेत्रात लीन्डाला चेंडू सोपविला. त्यावर तिने अचूक गोल नोंदवत भारताच्या एकतर्फी विजयावर शिक्कामोर्तब केला.