For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

8 कंपन्यांच्या आयपोओंना सेबीने दिली मंजुरी

06:33 AM Feb 10, 2026 IST | Tarun Bharat Portal
8 कंपन्यांच्या आयपोओंना सेबीने दिली मंजुरी
Advertisement

इन्क्रेड होल्डिंग्ज, आरावी इंजिनियरिंगचा समावेश : वित्त, पायाभूत सुविधा क्षेत्रातल्या कंपन्या

Advertisement

नवी दिल्ली :

भारतीय शेअर बाजारातील नियामक सेबीने आठ कंपन्यांना त्यांचे आयपीओ सादर करण्यासाठी मंजुरी दिली आहे. यामध्ये इन्क्रेड होल्डिंग, आरावी इंजिनियरिंग, एलिव्हेट कॅम्पस यासह इतर कंपन्यांचा समावेश आहे. या 8 कंपन्या येत्या काळामध्ये शेअर बाजारात बीएसई आणि एनएसईवर सुचीबद्ध होणार आहेत.

Advertisement

सदरच्या आठ कंपन्यांमध्ये वित्त सेवा, पायाभूत सुविधा, अभियांत्रिकी शिक्षण आणि निर्मिती कार्याशी संबंधित असणाऱ्या कंपन्यांचा समावेश आहे. वित्त सेवा क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या इनक्रेड होल्डिंग्स यांना आयपीओ दाखल  करण्यासाठी सेबीची मंजुरी मिळाली आहे. पर्सनल लोन, स्टुडन्ट लोन याव्यतिरिक्त एमएसएमई क्षेत्राकरिता विशेष कर्जसुविधा अशा विविध सेवा कंपनी देत असते. आजपर्यंत पाहता कंपनीने 25000 कोटीपेक्षा अधिक कर्ज वितरीत केले आहे. 140 हून अधिक ब्रँच कंपनीच्या असून 2600 कर्मचारी त्यांच्याकडे काम करत आहेत.

आरावी इंजिनियरिंग, आर्मी इन्फोटेक

अभियांत्रिकी आणि आयटी पायाभूत सेवा क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या आरावी इंजिनियरिंग कन्सल्टंट यांच्या आयपीओलाही मंजुरी मिळाली आहे. 202 कोटी रुपयांचा हा आयपीओ असणार असून ताजे समभाग सादर केले जाणार आहेत. प्रवर्तक व्यंकटाचला चक्रपाणी रेडला यांच्याकडून 67 लाख इक्विटी समभाग ऑफर फॉर सेल अंतर्गत सादर केले जाणार आहेत. वाहतूक, पाणी आणि शहरी विकासामध्ये पायाभूत अभियांत्रिकी आणि प्रकल्प व्यवस्थापनाची सेवा कंपनी देते. याव्यतिरिक्त आयटी सिस्टीम इंटिग्रेटर आर्मी इन्फोटेक यांच्या आयपीओलाही मंजुरी दिली आहे. अहमदाबादमध्ये मुख्यालय असणाऱ्या या कंपनीने आयपीओ अंतर्गत 300 कोटी रुपयांचे ताजे समभाग सादर करण्याचा निर्णय घेतला आहे. कोलकत्ता मध्ये मुख्यालय असणाऱ्या केबल आणि कंडक्टर निर्मितीच्या कार्यात असणाऱ्या लेझर पॉवर अँड इन्फ्रा यांच्या आयपीओला देखील मंजुरी मिळाली असून आयपीओच्या माध्यमातून 1200 कोटी रुपये उभारण्याची योजना कंपनीने आखली आहे.

एलिव्हेट कॅम्पस 2550 कोटी उभारणार

यासोबतच एलिव्हेट कॅम्पस यांच्या आयपीओला मंजुरी मिळाली असून 2550 कोटी रुपये उभारले जाणार आहेत. आयपीओ अंतर्गत ताजे समभाग जारी केले जाणार आहेत. शैक्षणिक पायाभूत सुविधांतर्गत सेवा पुरवणारी प्लॅटफॉर्म कंपनी असून कॅम्पस पायाभूत सुविधा राबवण्याचे काम ही कंपनी करते.

यांचेही येणार आयपीओ

याव्यतिरिक्त शंकेश ज्वेलर्सचाही आयपीओ सादर होणार असून 3 कोटींचे ताजे समभाग व 1 कोटीचे समभाग ऑफर फॉर सेलअंतर्गत सादर केले जातील. मेटल रिसायकलींग क्षेत्रातील आरडी इंडस्ट्रीज यांनाही आयपीओ सादर करण्यासाठी मंजुरी मिळाली असून 320 कोटी रुपयांचे ताजे समभाग आणि 3.77 कोटी समभाग ऑफर फॉर सेल अंतर्गत सादर केले जाणार असल्याचे समजते. ऑटो आणि औद्योगिक इलेक्ट्रॉनिक संबंधित कंपनी सेडमॅक मेकाट्रॉनिक्स यांचाही आयपीओ मंजूर झाला असून आयपीओ पूर्णपणे ऑफर फॉर सेल अंतर्गत असणार आहे.

विदेशी चलनसाठा उच्चांकावर

30 जानेवारी संपलेल्या आठवड्यात देशाचा विदेशी चलनसाठा 14.361 अब्ज डॉलर्सने वाढत 723.774 अब्ज डॉलर्सवर पोहोचला आहे. हा एक ऐतिहासिक विक्रम ठरला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांनी ही माहिती शेअर बाजाराला दिली आहे. याच दरम्यान सुवर्णसाठा 14.595 अब्ज डॉलर्सने वाढत 137.683 अब्ज डॉलर्सवर पोहोचला होता.

Advertisement
Tags :

.