सेबीच्या चेअरमन माधवी बुच होणार निवृत्त
वृत्तसंस्था/ कोलकाता
सेबी अर्थात सेक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्डच्या चेअरमन माधवी पुरी बुच यांचा 28 फेब्रुवारीला कार्यकाळ संपणार असून त्यानंतर या पदाची धुरा कोणाकडे जाणार हे पाहावे लागणार आहे. याकरीता अर्थमंत्रालयाने या पदासाठी डीइए संकेतस्थळावर अर्ज करण्याचे आवाहन केले आहे.
वरील पदासाठी अर्ज करायचा झाल्यास 17 फेब्रुवारी ही शेवटची तारीख असणार आहे. माधवी पुरी बुच यांनी 1 मार्च 2022 मध्ये सेबीच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली. सेबीच्या पहिल्या वहिल्या महिला चेअरमन होण्याचा मान त्यांना मिळाला होता. खासगी क्षेत्रातून आलेल्या त्या पहिल्या व्यक्ति असून सर्वात कमी वयात त्या या पदावर विराजमान झाल्या. याआधी एप्रिल 2017 पासून ऑक्टोबर 2021 पर्यंत सेबीच्या पूर्णवेळ सदस्य म्हणून त्यांनी कार्य केले होते.
सेबी चेअरमन कार्यकाळ वाढणार
याखेपेला मात्र सेबीच्या चेअरमनपदाचा कार्यकाळ 5 वर्षाचा असणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यापूर्वी हा कालावधी तीन वर्षाचा होता. अर्थमंत्रालयाने यासंदर्भात आर्थिक बाबतीतील विभाग (डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक अफेयर्स) च्या संकेतस्थळावर इच्छुकांना अर्ज करण्यास आवाहन केले आहे.
वादात...
त्यांच्याबाबतीत कार्यकाळात अलीकडे वाद निर्माण झाले होते. अमेरिकेतील शॉर्ट सेलर हिंडनबर्ग व काही राजकीय पक्षांनी अदानी समूहाच्या चौकशीबाबत माधवी यांच्या कामगिरीवर संशय व्यक्त केला होता. काँग्रेसने त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. पण माधवी आणि त्यांच्या पतीने हे आरोप फेटाळले होते.
कार्यकाळ वाढणार का
28 फेब्रुवारीपर्यंत सेबीच्या चेअरमनपदासाठी योग्य उमेदवार जर का नाही मिळाला तर त्यांना वाढीव काळ मिळू शकतो. तज्ञांच्या मते या पदासाठी अनेकजण इच्छुक आहेत. पण उमेदवार मिळाला नाही तर कालावधी त्यांना वाढवून मिळेल असे म्हटले जात आहे. नवा उमेदवार मिळाला तरी कदाचित चेअरमनपदाचा कार्यकाळ काही काळाकरीता वाढवून मिळेल, असाही एक मतप्रवाह आहे.