कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

गणेशोत्सवातील नियमित रेल्वेगाड्यांची आसन क्षमता संपली !

12:26 PM Jun 26, 2025 IST | Radhika Patil
Advertisement

खेड / राजू चव्हाण :

Advertisement

यंदा २७ ऑगस्टपासून गणेशोत्सवाची धामधूम सुरू होणार आहे. गणेशोत्सवात कोकण मार्गावर धावणाऱ्या नियमित गाड्यांचे आरक्षण खुले होताच अवघ्या दीड मिनिटातच सर्वच नियमित गाड्या हाऊसफुल्ल झाल्या. सर्वच नियमित गाड्यांची आसन क्षमता संपल्याने 'रिग्रेट'चा शेरा मिळत आहे. यामुळे आरक्षित तिकिटांसाठी तासन्‌तास तिकिट खिडक्यांवर उभे राहूनही चाकरमान्यांच्या पदरी निराशा पडली आहे. त्यांना आतापासूनच गाव गाठण्याची चिंता सतावू लागली आहे.

Advertisement

गणेशोत्सवासाठी लाखोंच्या संख्येने चाकरमानी गावी दाखल होतात. रेल्वे प्रशासनाने यंदा ६० दिवस अगोदरच म्हणजेच २३ जूनपासून आरक्षणाची दालने खुली केली. त्यानुसार चाकरमान्यांची गणेशोत्सवात गावी जाण्यासाठी आरक्षित तिकिटे पदरात पाडण्यासाठी सकाळपासूनच तिकिट खिडक्यांवर झुंबड उडाली. मात्र अवघ्या दीड मिनिटातच नियमित रेल्वेगाड्यांचे आरक्षण फुल्ल झाले. यामुळे असंख्य चाकरमानी प्रतीक्षा यादीवर राहिले. यानंतर 'रिग्रेट'चाच शेरा मिळत असल्याने चाकरमानी कोंडीत अडकले आहेत. कोकण मार्गावरून धावणाऱ्या तुतारी एक्प्रेस, सुपरफास्ट कोकणकन्या, मांडवी, मत्स्यगंधा, एलटीटी-मडगाव, मुंबई-मंगळूर या एक्स्प्रेस गाड्यांची गणेशोत्सवातील आसन क्षमता संपली आहे. यामुळे या सर्व गाड्यांचे शेकडो गणेशभक्त प्रतीक्षा यादीवर आहेत. रेल्वे प्रशासनाने अजूनही गणपती स्पेशल गाड्यांची घोषणा केलेली नाही. यामुळे गणेशभक्तांची सारी मदार आता गणपती स्पेशल गाड्यांवर अवलंबून आहे. कोकण विकास समितीसह अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती, जल फाऊंडेशनसह अन्य प्रवासी संघटनांनी गणेशोत्सवात कोकण मार्गावर विशेष गाड्या चालवण्यासाठी आग्रह धरला आहे. मुंबई-चिपळूणसह मुंबई-सावंतवाडी स्वतंत्र विशेष गाडी चालवण्याची मागणीही केली जात आहे. तशी निवेदनेही केंद्रीय रेल्वेमंत्र्यांसह रेल्वे बोर्डाला देण्यात आली आहेत. केवळ निवेदने देवून न थांबता सातत्याने पाठपुरावाही सुरू आहे. रेल्वे बोर्ड सकारात्मक निर्णय घेवून गणेशभक्तांना दिलासा देईल, अशी गणेशभक्त बाळगून आहेत. कोकण रेल्वे प्रशासनाने यंदाही दिवा-चिपळूण व दिवा-रत्नागिरी मेमू स्पेशल चालवण्याच्या दृष्टीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी गणेशभक्तांकडून करण्यात येत आहे.

केवळ पनवेल, चिपळूण, रत्नागिरी, गोवा असे मोजकेच थांबे घेणाऱ्या सुपरफास्ट गाड्यांना तात्पुरते वाढीव थांबे देणे आवश्यक होते. कोकण मार्गावर कमी डब्यांच्या गाड्या चालवणे संयुक्तिक नाही. त्यामुळे आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करून किंवा टर्मिनल व देखभाल दुरुस्तीचे ठिकाण बदलून वंदे भारत २० डब्यांची, तर जनशताब्दी, तेजस, तुतारी, मंगळूर सुपरफास्ट, रत्नागिरी-दिवा, सावंतवाडी-दिवा, तिरुनेलवेली-दादर, मडगाव-बांद्रे, पुणे-एर्नाकुलम, गरीबरथ या गाड्या २२ एलएचबी डब्यांनी चालवल्यास आणखी जास्त प्रवासी सामावून घेता येतील, असे कळवा-ठाणेतील रेल्वे अभ्यासक अक्षय महापदी यांनी सांगितले.

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article