गुगल सर्चवर नंबर शोधताय? गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकताय!
सायबर गुन्हेगारांकडून होतेय लूट : एपीके फाईल पाठवून रक्कम हडप, हॉस्पिटल-संस्थांच्या अधिकृत अॅपवरून मिळवा नंबर
देशभरात घडलेल्या डिजिटल अरेस्टचे प्रकार केंद्रीय यंत्रणांनी गांभीर्याने घेतले आहेत. ते रोखण्यासाठी व या प्रकारात गुंतलेल्या गुन्हेगारांना अद्दल घडविण्यासाठी देशभरातील बहुतेक डिजिटल अरेस्टचे प्रकार सीबीआयकडे सोपविण्यात येत आहेत. आता नवा कायदाही येतो आहे. म्हणूनच की काय, सायबर गुन्हेगारांनी आपल्या गुन्हेगारीच्या पद्धतीत बदल केले आहेत.
त. भा. प्रतिनिधी
बेळगाव : गेल्या एक-दोन वर्षांतील सायबर गुन्हेगारांच्या गुन्हेगारीची पद्धत लक्षात घेता वेळोवेळी त्यांनी आपल्या कार्यपद्धतीत बदल केला आहे. आता सावजांना लुटण्यासाठी नवी क्लृप्ती लढविण्यात आली आहे. गुगलवर एखादी व्यक्ती, एखादी संस्था, डॉक्टर, दवाखाने यांचे नंबर सर्च करून त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न महागात पडतो आहे. गेल्या पंधरवड्यात बेळगाव शहर व जिल्ह्यात घडलेल्या काही प्रकारांमुळे गुगल सर्च करून मिळविलेले नंबर किती सुरक्षित आहेत? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
हनुमाननगर येथील एका उद्योजकाला डॉक्टरची अपॉईंटमेंट घ्यायची होती. बेळगाव येथील डॉक्टरांचा नंबर मिळत नाही म्हणून त्यांनी गुगल सर्च केले. गुगलवरून मिळविलेल्या मोबाईल क्रमांकावर त्यांनी संपर्क साधला. सुरुवातीला कोणी फोन उचलला नाही. थोड्या वेळात तिकडून फोन आला. आम्हाला डॉक्टरांची अपॉईंटमेंट घ्यायची आहे, असे त्या उद्योजकांनी सांगितले.
अपॉईंटमेंट हवी असेल तर व्हॉट्सअप एक फॉर्म पाठवतो, तो भरून आम्हाला पाठवा, तुम्हाला अपॉईंटमेंट मिळेल असे सांगण्यात आले. डॉक्टरांना तातडीने भेटणे गरजेचे होते. त्यामुळे भामट्यांनी व्हॉट्सअपवर पाठविलेल्या हॉस्पिटल अपॉईंटमेंट बुकिंग नावाने आलेल्या एपीके फाईलवर त्यांनी क्लिक केले. डॉक्टरांची अपॉईंटमेंट तर मिळाली नाही मात्र संजीवकुमार या व्यावसायिकाच्या पत्नीच्या बँक खात्यातील 98 हजार रुपये गुन्हेगारांनी पळविले. 9 जुलै रोजी ही घटना घडली आहे.
दुसरी घटना रायबाग तालुक्यात घडली आहे. कुडची येथील एका शिक्षिकेला बेंगळूर येथील एका नेत्ररोग तज्ञांची अपॉईंटमेंट घ्यायची होती. नारायण नेत्रालयामध्ये त्या आपल्या मुलाला दाखवणार होत्या. 11 जुलै रोजी त्यांनी हॉस्पिटलचा नंबर मिळवण्यासाठी गुगल सर्च केले. त्यांच्याबाबतही असाच प्रकार घडला. आम्ही तुम्हाला ऑनलाईन फॉर्म पाठवतो, तो भरून पाठवा, तुम्हाला अपॉईंटमेंट मिळेल, असे सांगितले होते.
शिक्षिकेच्या व्हॉट्सअप आलेली एपीके फाईल त्यांनी उघडली. त्यांनाही डॉक्टरांची अपॉईंटमेंट मिळाली नाही किंवा त्या दवाखान्याशी संपर्कही साधता आला नाही. मात्र त्यांच्या बँक खात्यातून 11 ते 13 जुलै दरम्यान टप्प्याटप्प्याने 5 लाख 10 हजार 30 रुपये सायबर गुन्हेगारांनी पळविल्याचे उघडकीस आले. या दोन्ही प्रकरणांची शहर व जिल्हा सायबर क्राईम विभागात नोंद झाली आहे. सायबर गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.
बेळगाव परिसरात आणखी एक घटना घडली आहे. सरस्वतीनगर-गणेशपूर येथील आप्पाण्णा कृष्णगौडर या वृद्धाच्या घरी 15 जुलै रोजी फ्लिपकार्टच्या माध्यमातून एक पार्सल आले. 505 रुपये भरून त्यांच्या पत्नीने ते पार्सल स्वीकारले. ते उघडून पाहिल्यानंतर हे आपण किंवा आपल्या कुटुंबातील कोणीही मागवले नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. पार्सल परत करण्यासाठी फ्लिपकार्टचा नंबर गुगल सर्च करून मिळवला.
गुगलवरून मिळालेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला. तुम्ही दिलेले पार्सल आमचे नाही. आम्ही पार्सल परत करतो. आमचे 505 रुपये तुम्ही परत करा, असे आप्पाण्णा यांनी सांगितले. मात्र, त्यांनी संपर्क साधलेला मोबाईल क्रमांक फ्लिपकार्टशी संबंधित नव्हता. तो सायबर गुन्हेगारांचा होता. युपीआयच्या माध्यमातून पैसे परत करण्याचे सांगून थोड्या वेळाने बॅलन्स चेक करण्यास सांगितले. आप्पाण्णा यांच्या खात्यात 1 लाख 3 हजार 29 रुपये होते. थोड्या वेळात 98 हजार व 2 हजार असे दोन ट्रान्झॅक्शन झाले. सायबर गुन्हेगारांनी 15 जुलै रोजी दुपारी त्यांच्या बँक खात्यातून 1 लाख रुपये पळविले.
गेल्या महिन्यात घडलेल्या या तीन घटना लक्षात घेता सायबर गुन्हेगारांनी आपली कार्यपद्धत बदलल्याचे दिसून येते. सध्या कोणाचाही मोबाईल नंबर मिळवण्यासाठी गुगलवर अवलंबून राहण्याची परिस्थिती आहे. तेच धोकादायक ठरत आहे. गुगलमध्ये मिळणारे प्रत्येक फोन नंबर अधिकृत असतातच, असे नाही. एखादे हॉस्पिटल किंवा संस्थेच्या अधिकृत अॅपवर संपर्क न साधता गुगल सर्च करून मिळविलेल्या नंबरवरून फसवणूक होऊ शकते. व्हॉट्सअपवर सायबर गुन्हेगारांकडून पाठविले जाणारे लिंक म्हणजेच एपीके फाईल असते. स्क्रीन शेअरींग अॅप व एपीके फाईल डाऊनलोड केली तर आपली फसवणूक ठरलेलीच असते.