For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नेपाळमध्ये बेपत्ता लोकांचे शोधसत्र सुरूच

06:04 AM Sep 01, 2026 IST | Tarun Bharat Portal
नेपाळमध्ये बेपत्ता लोकांचे शोधसत्र सुरूच
Advertisement

महापुरातील मृतांचा आकडा 933 वर पोहोचला : 4,247 बेपत्ता

Advertisement

वृत्तसंस्था/ काठमांडू

नेपाळमधील पुरामुळे मृतांचा आकडा सोमवारी 933 वर पोहोचला असून, अंदाजे 4,247 लोक अजूनही बेपत्ता आहेत. पूरग्रस्त आठही जिह्यांमधून मृतदेह सापडण्याचे सत्र सुरूच आहे. नेपाळमधील या आपत्तीच्या सहाव्या दिवशीही बचाव पथके बेपत्ता लोकांचा शोध घेत आहेत.

Advertisement

नेपाळच्या राष्ट्रीय आपत्ती जोखीम निवारण आणि व्यवस्थापन प्राधिकरणाच्या माहितीनुसार, आतापर्यंत चितवन जिह्यातून 272, पूर्व नवलपरासीतून 184, पश्चिम नवलपरासीतून 82 आणि गोरखा जिह्यातून 58 मृतदेह सापडले आहेत. त्याचप्रमाणे, नुवाकोटमधून 52, धादिंगमधून 50, तनहूमधून 36 आणि रसुवामधून 13 मृतदेह सापडल्याची माहिती सोमवारी देण्यात आली. शोधमोहिमेमध्ये 552 परदेशी नागरिकांचे मृतदेह सापडले आहेत. परदेशी नागरिकांसोबत प्रवास करणाऱ्या 127 नेपाळी नागरिकांचाही आतापर्यंत मृत्यू झाला आहे. एकट्या चितवनमध्ये 272 मृतदेह सापडले आहेत. नेपाळ पोलिसांच्या माहितीनुसार, आतापर्यंत 10,451 लोकांना वाचवण्यात आले आहे. 30 ऑगस्ट रोजी जलविद्युत प्रकल्पातून 15 चिनी नागरिक आणि 7 भारतीय नागरिकांना वाचवण्यात आले होते. दीर्घकाळ पाण्याशी संपर्क आल्याने अनेक मृतदेहांची अवस्था वाईट झाली आहे. प्रत्येक मृतदेहाला ओळख क्रमांक दिला जात असून त्याची नोंद ठेवली जात आहे. यानंतर, डीएनए चाचणीद्वारे मृतदेहांची ओळख पटवून ते त्यांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्याचे प्रयत्न केले जातील.

हिमनदीमुळे तयार झालेल्या तलावाचा धोका टळला

नेपाळ-तिबेट सीमेजवळ हिमनदी फुटल्यानंतर तयार झालेल्या तलावातील पाणी नैसर्गिक प्रवाहाने वाहून गेले आहे. चीनच्या जलसंपदा मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, तलावात साठलेले पाणी जवळजवळ पूर्णपणे वाहून गेल्यामुळे तलाव फुटून खालच्या भागातील अचानक येणाऱ्या पुराचा धोका टळला आहे.

बोगदा बचाव पथके तैनात

भारताने जलविद्युत प्रकल्पांच्या बोगद्यांमध्ये अडकलेल्या कामगारांना वाचवण्यासाठी फॉरेन्सिक पथके आणि बोगदा बचाव पथके तैनात केली आहेत. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या माहितीनुसार, 19 सदस्यीय भारतीय फॉरेन्सिक पथकाने काठमांडूमध्ये कामाला सुरुवात केली आहे. हे पथक पूरग्रस्तांच्या मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी डीएनए नमुन्यांची तपासणी करण्यास मदत करेल.

Advertisement
Tags :

.