For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राकसकोप जलाशयात बुडालेल्या टेम्पोसाठी शोधमोहीम

12:34 PM Dec 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
राकसकोप जलाशयात बुडालेल्या टेम्पोसाठी शोधमोहीम
Advertisement

वार्ताहर/तुडये

Advertisement

बुधवारी दुपारी राकसकोप जलाशयातील पाण्यात धुण्यासाठी नेण्यात आलेला छोटा मालवाहतूक टेम्पो न्यूट्रल झाल्याने पाण्यात बुडण्याची घटना घडली होती. गुरुवारी सकाळपासून सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत बुडालेल्या टेम्पोची शोधमोहीम करण्यात आली. मात्र अंधारामुळे ही मोहीम थांबविण्यात आली. बेळगाव येथील एचईआरएफ रेस्क्यू टीमने सकाळी 11 वाजल्यापासून टेम्पो बुडालेल्या ठिकाणापासून शोधमोहीम हाती घेतली. काठापासून 250 फूट अंतरावर चाळीस फूट खोलीवर कॅमेऱ्याच्या साहाय्याने वाहनाचा शोध लावण्यात दुपारी 3 वाजता यश आले. वाहनाला हूक टाकून क्रेनच्या साहाय्याने बाहेर काढण्यासाठी दोरी ओढण्यात आली. मात्र पहिल्याच दणक्यात हूक निसटल्याने वाहन पाण्याबाहेर काढण्यात अपयश आले. त्यानंतर पुन्हा 4 वाजल्यापासून 6 वाजेपर्यंत कॅमेऱ्याच्या साहाय्याने शोधमोहीम सुरू झाली. सव्वासहा वाजता वाहन कॅमेऱ्यात दिसून आले. पुन्हा हूक टाकून दोरी काठाशेजारील झाडाला बांधण्यात आली आहे. शुक्रवारी सकाळी वाहन पाण्याबाहेर काढण्यात येणार  आहे. एचईआरएफचे प्रमुख बसवराज हिरेमठ व त्यांचे सहकारी हाजगोळी येथील दशरथ पाटील, सोनोली येथील दर्शन झंगरुचे यांनी पाण्यात वाहन शोधण्याचे कार्य केले.

वाहन जलाशयात बुडण्याची पहिलीच वेळ

Advertisement

जलाशयात वाहन बुडण्याची ही पहिलीच वेळ आहे. यावर्षी जलाशय तुडुंब भरल्याने जलाशयाच्या काठावर असलेल्या रस्त्यापर्यंत पाणी आले आहे. ज्या ठिकाणी टेम्पो बुडाला त्याठिकाणी उतार आहे. त्यातच या ठिकाणी खडकाळ जमीन असल्याने वाहन रुतले नाही. उतारावरून सुमारे 250 फुटापर्यंत हे वाहन गेल्याने शोधमोहिमेत अनेक अडचणी आल्या. सुमारे 400 बघ्यांनी परिसरात उपस्थिती लावल्याने घटनेची चर्चा सुरू होती.

Advertisement
Tags :

.