दोडामार्गात बांगलादेशींच्या शोधासाठी 'सर्च ऑपरेशन '
सिंधुदुर्ग क्राईम ब्रांच पथक व दोडामार्ग पोलिसांची मोहिम
दोडामार्ग - वार्ताहर
सिंधुदुर्ग पोलीस दलातील क्राईम ब्रांच पथक व दोडामार्ग पोलीस यांनी दोडामार्ग शहरात बांगलादेशी वास्तव्यास राहत आहेत की नाही याची खात्री करण्यासाठी अचानक 'सर्च ऑपरेशन ' मोहीम राबवली. यामध्ये तब्बल 60 जणांची झाडाझडती घेण्यात आली. परंतु ते बांगलादेशी नव्हते. मात्र वास्तव्यास असलेल्या भाडेकरूंबाबत सविस्तर माहिती येत्या दोन दिवसात पोलीस स्थानकात न दिल्यास त्यांना थारा देणाऱ्या घरमालकावर थेट गुन्हे दाखल करणार असल्याची तंबीच दोडामार्ग पोलिसांनी दिली.
याबाबत अधिक माहिती अशी की, दोडामार्ग शहरात दिवसेंदिवस परप्रांतीयांचे वास्तव्य वाढत असल्याच्या तसेच त्यामुळे शहरात गुन्हेगारी देखील वाढत असल्याच्या तक्रारी नागरिकांमधून येत होत्या. त्या पार्श्वभूमीवर दोडामार्ग पोलिसांनी देखील शहरातील सर्व घर मालक तसेच त्यांच्याकडे भाडेकरू म्हणून राहत असलेल्या विशेषत: परप्रांतीयांना दोडामार्ग पोलीस ठाण्यात नोंद करण्याच्या सूचना यापूर्वीच केल्या आहेत. मात्र अद्यापही बरेच जण या सूचनेचे पालन करताना दिसत नाहीत.
[ धाटवाडी परिसरात अचानक सर्च ऑपरेशन ]
त्या अनुषंगाने शहरात कोठे बांगलादेशी लपले आहेत का? याबाबत सिंधुदुर्ग पोलीस दलातील क्राइम ब्रांच अर्थात गुन्हा अन्वेषण विभाग व दोडामार्ग पोलीस यांनी शहरातील आयी रोड - प्राथमिक शाळा परिसरात सर्च ऑपरेशन केले. खालची धाटवाडी या ठिकाणी काल मंगळवारी रात्री उशिरा अचानक सुरू झालेल्या या कार्यवाहीने संबंधित परप्रांतीय व घरमालक यांची अक्षरशः तारांबळ उडाली. येथे भाडेकरु म्हणुन राहत असलेल्या तब्बल ६० जणांची या पोलीस पथकाने कसून चौकशी केली. त्यांचे आधारकार्ड तसेच अन्य वास्तव्याचे पुरावे यांची देखील चौकशी करून व्यवस्थित चाचपणी या पोलीस पथकाने केली. संबधित व्यक्तींची आधारकार्ड च्या वेबसाईट वर संबधित व्यक्तीं कोणत्या राज्यातील आहेत याबाबतची तपासणी केली. या तपासणी दरम्यान कोणीही बांगलादेशी नसल्याचे व भारतातील अनेक भागातील सेंट्रींग कामगार, विहीर बांधणी कामगार वगैरे असल्याचे निष्पन्न झाले. यावेळी दोडामार्ग पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी, पोलीस हवालदार विठोबा सावंत, राजेश गवस यांसह गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस उपनिरीक्षक सुधीर सावंत, सहाय्यक पोलीस फौजदार सुरेश राठोड, पोलीस हवालदार प्रमोद काळसेकर अनुपकुमार खंडे, आशिष गंगावणे, पोलीस नाईक अमित पालकर आदी उपस्थित होते.