जम्मूमध्ये शोधमोहीम; दोन संशयित ताब्यात
संयुक्त सुरक्षा पथकाकडून व्यापक तपासणी
वृत्तसंस्था/ श्रीनगर
सुरक्षा दलांनी जम्मू प्रदेशात दहशतवादविरोधी कारवाई तीव्र केली आहे. सोमवारी संशयास्पद कारवायांमध्ये सहभागी असलेल्या दोन जणांना ताब्यात घेण्यात आले. लष्कराच्या क्विक रिअॅक्शन टीमने सकाळी 10:30 च्या सुमारास सांबा जिह्यातील बारी ब्राह्मणा परिसरातील त्यांच्या छावणीजवळून दोन्ही संशयितांना ताब्यात घेतले. त्यानंतर दोघांनाही चौकशीसाठी स्थानिक पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. 18 जानेवारी रोजी सोनार गावात झालेल्या चकमकीनंतर ही मोहीम सुरू झाली आहे.
उंच भागात लपलेल्या दहशतवाद्यांना पकडण्यासाठी सुरक्षा दल पूंछ, राजौरी, कठुआ, डोडा आणि रियासी जिह्यातील अनेक उंच भागात शोधमोहीम राबवत आहे. 31 जानेवारी रोजी छत्रू येथील डोलगाम गावातून दहशतवादी पळून गेल्यानंतर कोणताही नवीन संपर्क झालेला नाही. याचदरम्यान, किश्तवाड जिह्यातील बर्फाच्छादित चतरू भागात शोधमोहीम पुन्हा सुरू झाली आहे. याठिकाणी गेल्या दोन आठवड्यात किमान चार चकमकी झडल्या होत्या. या चकमकीत सहभागी असलेल्या दहशतवाद्यांचा शोध घेतला जात आहे. या मोहिमेच्या सोळाव्या दिवशी सोमवारी लष्कर, पोलीस आणि सीआरपीएफच्या संयुक्त पथकाने गुडघ्यापर्यंतच्या बर्फातून मार्गक्रमण करत दहशतवाद्यांना शोधण्याचा प्रयत्न केला.
रामनगर सेक्टरच्या जोफर भागातही रविवारी रात्री संशयास्पद हालचाली दिसून आल्यानंतर उझ नदीच्या काठावरील जोफर, मार्ता, कुलथियान, सोहन, खिल आणि चौर मोटू भागात मोठ्या प्रमाणात शोधमोहीम सुरू करण्यात आली. तथापि, कोणताही संशयित सापडला नाही. शिवाय, दहशतवाद्यांच्या उपस्थितीची माहिती मिळाल्यानंतर उधमपूर जिह्यातील रामगड जंगलात आणि राजौरी जिह्यातील कालुस टॉप परिसरात कारवाई सुरू करण्यात आली होती.