‘आयपीएल’साठी ‘टायटल स्पॉन्सर’ शोधण्यास प्रारंभ
बोली मागविताना ‘बीसीसीआय’कडून कडक अटी, चिनी कंपन्यांची वाट बंद करण्याचा प्रयत्न
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
इंडियन प्रीमियर लीगसाठी नवीन शीर्षक प्रायोजक (टायटल स्पॉन्सर) शोधताना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने बोली लावण्यास इच्छुक असलेल्यांकरिता कठोर अटी घातल्या असल्याचे एका वृत्ताने स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे ‘बीसीसीआय’ने भारतासोबत सौहार्दपूर्ण संबंध न ठेवणाऱ्या राष्ट्रांशी असलेल्या संलग्नतेबद्दल आशंका दाखवून चीनमधील कंपन्या किंवा ब्रँड्सच्या बोलीचा विचार करण्यास संकोच दर्शवला आहे.
यासंदर्भात विशिष्ट देश किंवा ब्रँड्सचा स्पष्ट उल्लेख केलेला नसला तरी, बीसीसीआयचा हा निर्णय जनतेमधून उठलेल्या प्रतिक्रिया आणि ‘व्हिवो’ या चिनी स्मार्टफोन निर्माता कंपनीच्या बाबतीत आलेला नकारात्मक अनुभव यातून आला आहे. भारत आणि चीन यांच्यातील सीमा विवादानंतर ही परिस्थिती उद्भवली. त्यानंत ‘व्हावो’ने पाच वर्षांच्या प्रायोजकत्व करारातून बाहेर पडणे पसंत केले आणि सदर हक्क टाटा समूहाने मिळविले.
निविदा मागविताना नमूद केलेल्या एका महत्त्वपूर्ण कलमानुसार, बोलीदार असलेली कॉर्पोरेट कंपनी ज्यांच्याशी भारताचे मैत्रीपूर्ण संबंध नाहीत अशा अधिकारक्षेत्रातील वा प्रदेशातील असता कामा नये. बोलीदार कंपनीत भारताचे मैत्रिपूर्ण संबंध नसलेल्या अधिकारक्षेत्रातील वा प्रदेशातील कोणताही भागधारक किंवा प्रस्तावित भागधारक समाविष्ट असल्यास बोलीदाराला अशा भागधारकाकडे किती हिस्सा आहे त्याचा किंवा त्याच्या पालक कंपनीचा तपशीलवार तक्ता आणि सर्व भागधारकांचे मूळ मालक वा लाभार्थी यांचा तपशील सादर करावा लागेल.
‘बीसीसीआय’ने अपात्र बोलीदारांची यादी विस्तृत करताना फँटसी गेम्स, स्पोर्ट्सवेअर, क्रिप्टोकरन्सी, सट्टेबाजी, जुगार आणि अल्कोहोल उत्पादनांशी निगडीत कंपन्यांचा त्यात समावेश केलेला आहे. विशेष म्हणजे, अॅथलेजर, परफॉर्मन्स वेअर आणि स्पोर्ट्सवेअरमध्ये गुंतलेल्या व्यवसायांना देखील भाग घेण्यास मनाई करण्यात आली आहे. प्रायोजकत्वासंदर्भातील निविदेला मिळालेला सुऊवातीचा प्रतिसाद प्रचंड सकारात्मक नसला, तरी बीसीसीआयला ‘आयपीएल’च्या जागतिक दर्जामुळे प्रतिष्ठित कंपन्या बोली लावतील, अशी अपेक्षा आहे. सदर पाच वर्षांचा प्रायोजकत्व करार 2028 पर्यंत राहील.