प्रीतिसंगम बागेत घोणसच्या पिल्लांचा शोध
कराड :
येथील प्रीतिसंगम बागेत गेली दोन दिवस घोणस या विषारी सापाची ११ पिल्ले आढळून आल्याने नागरिकांच्या सुरक्षेच्या कारणावरून प्रीतिसंगम बाग दोन दिवस बंद ठेवण्यात आली होती. वाईल्डहार्ट रेस्क्यूच्या २० सर्पमित्रांनी शनिवारी सकाळी बागेच्या हिरवळीत आणखी पिल्लांचा शोध घेतला, मात्र नव्याने एकही पिल्लू सापडले नाही. बागेत वाढलेले गवत कापण्यास नगरपालिकेने प्रारंभ केला आहे.
गेले दोन दिवस प्रीतिसंगम बागेत घोणस सापाची ११ पिल्ले आढळून आली. हा सर्प विषारी असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे शुक्रवारी प्रीतिसंगम बाग बंद ठेवण्यात आली. सकाळी वाईल्डहार्ट रेस्क्यूच्या २० सर्पमित्रांनी बागेत सापाच्या पिल्लांचा शोध घेतला. मात्र नव्याने एकही पिल्लू आढळून आले नाही. त्यानंतर शोधमोहीम थांबवण्यात आली. सायंकाळी पुन्हा शोधमोहीम राबवली. त्यावेळी एका ठिकाणी पिल्लू दिसले. मात्र नंतर ते निघून गेले. रात्री उशिरापर्यंत बागेत शोध सुरू होता. पालिकेने बागेतील वाढलेले गवत कापण्याचे काम तत्काळ सुरू करण्यात आले आहे.
बागेत यापूर्वीही सर्प आढळून आले आहेत. बागेच्या एका बाजूस असणारी झाडी तसेच नदीकाठची संरक्षक भिंत यामुळे सर्वांना आश्रयस्थान निर्माण झाले आहे. घोणस सर्पाचा सध्या प्रजननाचा काळ आहे. घोणस एकावेळी ३ ते ६३ पिलांना जन्म देते. प्रीतिसंगम बागेत आत्तापर्यंत ११ पिल्ले सापडली असून आणखी पिल्ले येथे असावी असा कयास आहे. मात्र नागरिकांनी बागेत जाताना खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे