अनगोळ-मजगाव परिसरात वीज केंद्रासाठी जागेचा शोध
110 केव्हीए वीज केंद्राचा प्रस्ताव : उद्योगांसह घरगुती वीज ग्राहकांना होणार फायदा
त. भा. प्रतिनिधी
बेळगाव
शहरात विजेची मागणी वाढत असून सध्या वीजपुरवठा करणारे विद्युत केंद्र कमी पडू लागले आहे. त्यामुळे अनगोळ-मजगाव परिसरात नव्या विद्युत केंद्रासाठी हेस्कॉमकडून जागेची पाहणी केली जात आहे. या परिसरात सरकारी जागा उपलब्ध नसून खासगी जागांचे दर गुंठ्यांवर सांगितले जात असल्याने वीज केंद्राचा प्रश्न अधांतरीच राहिला आहे.
उद्यमबाग पाठोपाठ अनगोळ, मजगाव या परिसरातील औद्योगिक वसाहत वाढत आहे. त्यामुळे विजेची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. उद्यमबाग, मच्छे, पिरनवाडी येथील औद्योगिक वसाहतींसाठी उद्यमबाग वीज केंद्रातून वीजपुरवठा केला जातो. या वीज केंद्रावर आता मर्यादा येत आहे. त्यामुळे एखाद्या अतिरिक्त वीज केंद्राची गरज भासू लागली आहे. त्याचबरोबर वडगाव येथील 33 केव्हीए वीज केंद्रांतून शहरासह ग्रामीण भागासाठी वीजपुरवठा केला जातो. त्यामुळे या दोन्ही केंद्रांच्या मध्यंतरी एखादे नवीन वीज केंद्र सुरू करण्याचा विचार हेस्कॉम केपीटीसीएल प्रशासनाचा आहे.
हेस्कॉमकडून अनगोळ, मजगाव या परिसरात 110 केव्हीए स्टेशन उभारले जाणार आहे. यासाठी मागील काही दिवसांपासून जागेचा शोध सुरू आहे. सरकारी जागा उपलब्ध नसल्याने खासगी जागेवर अवलंबून राहावे लागणार आहे. शहर जवळ असल्याने जागेचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे या जागेचे दर हे गुंठ्यावर सांगितले जात आहेत. त्यामुळे जागा मिळाल्यास लवकरच एक नवीन विद्युत स्टेशन उभारले जाणार आहे.
उद्यमबाग 33 केव्हीए वीज केंद्र होणार 110 केव्हीए
सध्या उद्यमबागमध्ये दोन विद्युत केंद्रे असून यापैकी एक 110 केव्हीए व दुसरे 33 केव्हीए स्टेशन आहे. यापैकी 33 केव्हीए वीज केंद्राचे रूपांतर 110 केव्हीएमध्ये करून त्या वीज केंद्राची क्षमता वाढविली जाणार आहे. त्यामुळे आसपासच्या उद्योगांना अधिक चांगल्या दर्जाचा व सुरळीत वीजपुरवठा करणे सोयीचे होणार आहे. वीज केंद्राची क्षमता वाढवावी, अशी मागणी उद्योजकांनी केली होती. याचा विचार करून हेस्कॉमकडून प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.