भाजीविक्रेता कांबळे खूनप्रकरणी संशयिताचा शोध सुरूच
सांगली :
शंभरफुटी रस्त्यावर महेश प्रकाश कांबळे (वय ३९, रा. आंबा चौक, यशवंतनगर, सांगली) याचा खून केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेला मुजाहिद फिरोज शेख (रा. शिंदे मळा, कुपवाड रस्ता) आणि साथीदार या दोघांचा शोध सुरू आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषणसह सांगली शहर पोलिसांचे पथक दोघांच्या मागावर आहे. लवकरच त्यांना ताब्यात घेतले जाईल असे सांगण्यात आले.
मृत महेश कांबळे याने पैसे देवघेवीच्या कारणातून फिरोज शेख याचा २०२१ मध्ये खून केला होता. खून प्रकरणात त्याला अटक झाली होती. २०२३ मध्ये तो जामिनावर बाहेर आला होता. त्यानंतर तो कोथिंबीर विक्रीचा व्यवसाय करत होता. महेश कांबळे याने फिरोज शेखचा खून केल्यामुळे मुलगा मुजाहिद याच्या मनात सुडाची भावना पेटली होती. तसेच महेश याचे नात्यातील एका महिलेशी अनैतिक संबंध असल्याचे समजल्यामुळे तो आणखीनच चिडला होता. खुनाचा बदला घेण्यासाठी त्याने साथीदाराच्या मदतीने तो संधी शोधत होता. गुरुवारी सकाळी कोथिंबीर खरेदी केल्यानंतर महेश मोटारीतून शंभरफुटी मार्गे निघाला होता. लघुशंकेसाठी एका दुचाकी शोरूमजवळ थांबला असता मुजाहिद व साथीदाराने त्याच्यावर हल्ला केला. महेश गंभीर जखमी होऊन पडल्यानंतर दोघे तेथून पसार झाले. खून प्रकरणी मृत महेशचा भाऊ विजय कांबळे (रा. मौजे डिग्रज) यांनी फिर्याद दिली आहे. मुजाहिद व साथीदारावर गुन्हा दाखल आहे. खुनानंतर दोघांच्या शोधासाठी सांगली शहर व स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पथक दोघांच्या मागावर आहे. लवकरच दोघांना ताब्यात घेतले जाईल असे पोलिसांनी सांगितले.