ऑस्ट्रेलियाच्या बेटानजीक कोसळले सागरी विमान, 3 जणांचा मृत्यू
मेलबर्न :
ऑस्ट्रेलियाच्या एका बेटानजीक सागरी विमान दुर्घटनाग्रस्त झाले आहे. या दुर्घटनेत 3 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये वैमानिक आणि स्वीत्झर्लंड तसेच डेन्मार्कमधील प्रत्येकी एका पर्यटकाचा समावेश आहे. तर तीन जण या दुर्घटनेत जखमी झाले आहेत. रॉटनेस्ट बेटानजीक कोसळलेल्या विमानात 6 पर्यटक सवार होते, रॉटनेस्ट हे पर्थपासून सुमारे 30 किलोमीटर अंतरावरील एक लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे. पीडितांचे परिवार आणि मित्रांसोबत माझ्या संवेदना आहेत, असे उद्गार पश्चिम ऑस्ट्रेलियाचे प्रीमियर रोजर कुक यांनी काढले आहेत. दुर्घटना सुटीनिमित्त बेटावर पोहोचलेल्या लोकांसमोर घडली आहे. अधिकाऱ्यांनी दुर्घटनेचा कारणांचा शोध सुरू केला असल्याची माहिती राज्याचे पोलीस आयुक्त कर्नल ब्लँच यांनी दिली आहे. संबंधित विमान रॉटनेस्ट बेटावरून पर्थच्या दिशेने प्रवास करत असताना ही दुर्घटना घडली आहे. तज्ञ तपासकर्त्यांना घटनास्थळी पाठविण्यात आल्याची माहिती ऑस्ट्रेलियन परिवहन सुरक्षा ब्युरोने दिली आहे. उ•ाण करताना फ्लोटप्लेन पाण्याला धडकले आणि मग ते आंशिक स्वरुपात बुडाल्याचे ब्युरोचे मुख्य आयुक्त एंगस मिशेल यांनी सांगितले. पंतप्रधान एंथनी अल्बानीज यांनी दुर्घटनेला भयानक संबोधिले आहे.