पुरालेखागारची इमारत बंदीस्त करा, सीसीटीव्ही बसवा
जिल्हाधिकारी संजय शिंदे यांचे पवडी, पुरालेखागार विभागाला आदेश
करवीर तहसीलचा प्रवेश पूर्ववत ठेवा
ऐतिहासिक दस्तऐवज सुरक्षिततेसाठी परिसर सायलेंट झोनची मागणी
कोल्हापूर
करवीर तहसील कार्यालयाशेजारी असणाऱ्या कोल्हापूर पुरालेखागार इमारतीमध्ये ऐतिहासिक आणि महत्वाची दस्तावेज आहेत. याचे जतन संवर्धनासह ते सुरक्षित राहणे आवश्यक आहे. त्यामुळे पुरालेखागार इमारतीच्या कार्यालयाचा परिसर बंदीस्त करा, सीसीटीव्ही कॅमेरा बसवा, असे आदेश जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी सार्वजणिक बांधकाम विभागासह पुरालेखागार विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.
पुरालेखागार इमारतीमध्ये छत्रपती शिवरायांच्या आदेशाने गडकोट किल्ल्यांवर केलेल्या दुरुस्ती खर्चाच्या नोंदी, छत्रपती ताराराणी, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, छत्रपती राजाराम महाराज, शहाजीराजे तसेच इंग्रजांच्या शासनकाळातील अनेक ऐतिहासिक ठराव, कागदपत्रे आहेत. या इमारतीच्या परिसरातील तहसिलदार कार्यालयाची इमारत पाडून नवीन इमारत बांधण्यात येत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने हेरिटेज नियमांचे उल्लंघन करत कोल्हापूर पुरालेखागाराची पश्चिम बाजू म्हणजे रस्त्यापासूनची आतपर्यंत जागा ही तहसिलदार कार्यालयाच्या अखत्यारित घेण्यात येत असून तिथे वाहने, नागरिक यांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ वाढणार आहे. यामुळे येथील ऐतिहासिक दस्तावेजांना धोका निर्माण होऊ शकतो, असे परिख पुल नुतनीकरण समितीचे फिरोज शेख यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणले. यावर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पुरालेखागार विभाग, पवडी, परिख पूल नुतनीकरण समिती यांची शुक्रवारी बैठक घेतली.
यावेळी फिरोज शेख म्हणाले, पुरालेखागार विभागाची इमारत ब्रिटीश कालीन असून त्यांनी येथील दस्तऐवज सुरक्षित राहण्यासाठी हा परिसर सायलेंट झोन केला होता. परंतू सध्या या ठिकाणी करवीर तहसील कार्यालयाची नवीन इमारतीचा प्रवेश पुराभिलेखागार कार्यालयाच्या बाजूने केली जात आहे. यामुळे हा परिसर सायलेंट झोन राहणार नाही. त्यामुळे तहसील कार्यालयाची प्रवेश पूर्व जसा होता त्याप्रमाणेच ठेवावा. येथे सीसीटीव्हीसह 24 तास सुरक्षा व्यवस्था करावी. जागेवर जाऊन पाहणी व्हावी. हेरिटेज नियमानुसार इमारतीचे आधुनिकरण करावे. युनोस्काचा हेरिटेज सिटीच्या दर्जा मिळण्यसाठी शहरातील सर्वच हेरिटेज इमारती सुरक्षित करून पर्यटन वाढीसाठी यांची वेबासाईट तयार करावी.
यावर जिल्हाधिकारी संजय शिंदे म्हणाले, पुराभिलेखागारमधील सर्वच दस्ताऐवजचे तत्काळ डिजीटायझेन करावे. इमारत अधुनिक यंत्रसाम्रगी बसावावी. करवीर तहसीलची इमारतीचे काम करताना पुराभिलेखागार इमारतीस कोणताही अडथळा होणार याची दक्षता घ्यावी. परिख पूल नुतनीकरण समितीचे सदस्य आणि पवडी यांनी समन्वयाने शक्य ते बदल करावे. समितीने जे शक्य होणार नाही, त्याबाबत हट्ट करू नये, तसेच दोन दिवसांत जागेवर येऊन पाहणी केली जाईल. करवीर तहसील कार्यालय, पुराभिलेखागार विभाग, तलाटी कार्यालय यांचे 31 डिसेंबरपर्यंत स्वतंत्र प्रॉपटी कार्ड काढले जाईल,
यावेळी पुराभिलेखागार विभागाचे सहायक संचालक दिपाली पाटील, संशोधक सहाय्यक सर्जेराव पाटील, हेरिटेज समितीचे सदस्य उदय गायकवाड, अग्निशमन दलाचे प्रमुख मनिष रणभिसे, अर्किटेक्ट प्रशांत हडकर, चंद्रकांत पाटील, सुनीता पाटील, प्रा. निलमा व्हटकर, पम्पू सूर्यवंशी, संपतराव चव्हाण पाटील, धैर्यशील घाटगे, राहूल निंबाळकर, शिवराजसिंह गायकवाड आदी उपस्थित होते.
ऐतिहासिक दस्ताऐवज नष्ट होवू देवू नका
केशवराव भोसले नाट्यागृहाच्या आगीची घटना ताजी आहे. या ठिकाणी वास्तूचे नुकसान झाले. परंतू पुरालेखागार कार्यालयात 1600 सालापासूनचे ऐतहासिक आणि महत्वाचा दस्तऐवज नष्ट झाले तर पुन्हा उपलब्ध होणार नाहीत. त्यामुळे ही इमारत सुरक्षित असावी, अशी मागणी वैभवराजे भोसले यांनी केली.
71 हेरिटेज इमारत स्वच्छतेसाठी पुढाकार घ्या
सध्या शहरात 71 हेरिटेज इमारती असून त्याची स्वच्छता करण्याची जबाबदारीही सामाजिक संघटनांसह परिसरातील नागरिकांनी घ्यावी. समिती नेमून मनपाने नोडल अधिकाऱ्याची नियुक्त करावी. तसेच नव्याने हेरिटेजमध्ये समावेश करणाऱ्या 71 इमारतीचे नोटीफीकेशनसाठी मनपाने तत्काळ प्रक्रिया राबावी, असे आदेशही जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी दिले.
बैठकीसाठी चार तास प्रतिक्षा
दुपारी 3 वाजताची बैठक सायंकाळी 7 वाजता सुरू झाली. चार तास प्रतिक्षा करण्याची वेळ संबंधितांवर आली. दुसरीकडे बैठक सुरू होताच जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी बैठकीस कार्यकर्ते जास्त आणल्यावरून समितीस कानपिचक्या दिल्या.