किनारपट्टीवरील समुद्र झीजवर हवा तोडगा
कारवार समुद्र किनाऱ्याबरोबरच समुद्रालगत असलेली नारळाची झाडे होताहेत भुईसपाट
कारवार : पावसाचे आगमन होताच जिल्ह्याच्या किनारपट्टीवर वास्तव्य करून राहणाऱ्या शेकडो कुटुंबीयांना प्रत्येकवर्षी एका भेडसावणाऱ्या आणि गंभीर समस्येला तोंड द्यावे लागत आहे. अनेकांना या समस्येमुळे झोपेविना रात्री घालवाव्या लागतात. कधी कधी तर काहीजण या समस्येच्या गर्तेत अडकून सर्वस्व हरवून बसतात. ही एक अशी समस्या जी पावसाचे आगमन होताच सर्वांचे लक्ष वेधून घेते आणि पावसाने निरोप घेतल्यानंतर या समस्येचा सर्वांना विसर पडतो, त्या समस्येचे नाव आहे. ‘समुद्र झीज’.गेल्या काही वर्षांपासून या समस्येने किनारपट्टीवरील तालुक्यामध्ये गंभीर स्वरुप धारण केले आहे. या समस्येला जसा निसर्ग आहे, त्याहून या समस्येला जबाबदार आहे मानवाचा हावरटपणा.
या समस्येमुळे निसर्गाच्या शक्तीसमोर मानवाची शक्ती कमी ठरते याचा प्रत्यय अनेकवेळा आला आहे. एरव्ही ही समस्या ऐन पावसाच्या हंगामात डोकेवर काढते. तथापि, यावर्षी जिल्ह्याच्या किनारपट्टीवर मोसमी पावसाला लाजवेल असा मान्सूनपूर्व कोसळला आहे आणि कोसळत आहे. त्यामुळे यावर्षी या समस्येचे दर्शन मे महिन्यातच होत आहे. सध्या तरी अंकोला तालुक्यातील हारवाड येथील तरंगाबेट प्रदेशात या समस्येने सलामी दिली आहे. येत्या काही आठवड्यात या समस्येची लागण कारवार, कुमठा, होन्नावर आणि भटकळ तालुक्यात पसरणार आहे. गेल्या आठ दिवसांपासून होणाऱ्या जोरदार पाऊस, वाऱ्यामुळे समुद्र प्रक्षुब्ध झाला आहे. उंच उंच झेपावणाऱ्या लाटा किनाऱ्याचे लचके तोडत आहेत. किनाऱ्याबरोबर समुद्रालगत असलेली नारळाची झाडे भुईसपाट होत आहेत. ‘समुद्र झीज’ रोखण्यासाठी कोट्यावधी रुपये खर्च आणि दगड वापरुन बांधण्यात आलेली संरक्षण भिंत उद्ध्वस्त होत आहे.
तरंगाबेट येथे वास्तव्य करून राहणारे नागरिक भयभीत
तरंगाबेटसह किनारपट्टीवर अगदी किनाऱ्यालगत वास्तव्य करून राहणाऱ्यांची संख्या कमी नाही. तरंगाबेट येथे लोकवस्तीत पाणी शिरत आहे. झेपावणाऱ्या लाटा मागासवर्गीय बांधवांच्या घराचा घास केंव्हा घेतील याची खात्री नाही आणि मच्छिमारी म्हणून आपले संसार उद्ध्वस्त होण्यापूर्वी किंवा मृत्यूपूर्वी या समस्येवर कायमस्वरुपी तोडगा काढण्याची मागणी मच्छीमारी बांधवांच्याकडून केली जात आहे. या नागरिकांकडून किमान पावसाळ्याच्या हंगामात तरी सुरक्षितस्थळी घरे बांधून देण्याची किंवा जागा देण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
मुख्यमंत्र्यांनाही आपल्या आश्वासनाचा विसर
गेल्या वर्षीही हारवाड येथे समुद्र झीजने गंभीर स्वरुप धारण केले होते. प्रभावीत प्रदेशाला भेट दिलेल्या मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी या समस्येवर कायमस्वरुपी तोडगा काढण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर प्रभावीत जनतेला दिलासा मिळाला होता आणि अपेक्षाही उंचावल्या होत्या. तथापि, अद्याप तरी आश्वासनाच्या पूतर्तेसाठी ठोस पावले उचलण्यात आलेली नाहीत. गेल्या अनेक वर्षांपासून या समस्येवर या देशाचे तंत्रज्ञान, त्या देशाचे तंत्रज्ञान वापरुन तोडगा काढण्यात येईल, असे सांगितले गेले. सांगितलेले मंत्री, लोकप्रतिनिधी आले आणि गेले. तथापि, समस्या मूळ जागेवरच आहे. सरकार या समस्येवर मलम लावण्याच्या पलिकडे काही एक करीत नाही.