For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मांडवीकिनारी आजपासून ज्ञानसागर!

12:41 PM Feb 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
मांडवीकिनारी आजपासून ज्ञानसागर
Advertisement

गोवा पुस्तक महोत्सवाचे आज उद्घाटन : पाच दिवस गोवा होऊन जाणार पुस्तकमय

Advertisement

पणजी : देशभरातील वाचक, लेखक, प्रकाशक आणि विचारवंतांना एकत्र आणणारा, ‘अॅन ओशन ऑफ स्टोरीज‘ या संकल्पनेवर आधारित गोवा पुस्तक महोत्सव आजपासून पणजीत प्रारंभ होत असून पुढील पाच दिवस गोवा पुस्तकमय होणार आहे. आज सायंकाळी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याहस्ते महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. पणजी येथील भाऊसाहेब बांदोडकर मैदानावर आज दि. 4 ते 8 फेब्रुवारी दरम्यान हा महोत्सव होणार असून पूर्ण पाचही दिवसात देशपातळीवरील लेखक, साहित्यिक, वाचक, महनीय व्यक्ती आणि विद्यार्थी मिळून किमान दोन लाख लोक या महोत्सवास भेट देतील अशी अपेक्षा आहे.

रोज सकाळी 11 ते रात्री 8 या वेळेत खुला राहणाऱ्या या महोत्सवात प्रवेश विनामूल्य असून साहित्यप्रेमींना सर्व पुस्तकांवर 10 टक्के सवलत देण्यात येणार आहे. अभूतपूर्व असा हा साहित्य सोहळा नॅशनल बुक ट्रस्ट, इंडिया (एनबीटी) यांच्याद्वारे लोकमान्य सांस्कृतिक फाउंडेशन तसेच समर्थ युवा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला आहे. उद्घाटन सोहळ्यास मुख्यमंत्र्यांसोबत कला आणि संस्कृतीमंत्री डॉ. रमेश तवडकर, शिक्षण सचिव प्रसाद लोलयेकर, नॅशनल बुक ट्रस्टचे अध्यक्ष प्रा. मिलिंद मराठे, संचालक युवराज मलिक, लोकमान्य कल्चरल फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. किरण ठाकुर, पुणे पुस्तक महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे, आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

Advertisement

पुस्तकांचे 200 स्टॉल्स

मोबाईलसारख्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या युगात लोप पावत चाललेली वाचनसंस्कृती वाढविणे व समाजाला पुन्हा एकदा पुस्तकांच्या महत्त्वाशी जोडणे हा या महोत्सवाच्या आयोजनांमागील मुख्य उद्देश आहे. त्यामुळे सर्वाधिक पुस्तके उपलब्ध करण्याच्या हेतूने महोत्सवात 100 पेक्षा अधिक प्रकाशकांनी मिळून किमान 200 स्टॉल्स थाटण्यात आले आहेत. त्याद्वारे कोंकणी, मराठी, इंग्रजी यांसह अन्य भारतीय भाषांमधील लाखो पुस्तकांचा खजाना उपलब्ध होणार आहे.

गोवा वाचत आहे...

हा महोत्सव केवळ पुस्तक प्रदर्शनापुरता मर्यादित नसून त्यात पाचही दिवस राष्ट्रीय स्तरावरील साहित्यिकांच्या सहभागातून चर्चासत्रे, बाल साहित्य चित्रप्रदर्शन, ‘गोवा वाचत आहे’ या शीर्षकाखाली छायाचित्र प्रदर्शन, नामांकित बँडचे सांस्कृतिक कार्यक्रम तसेच मुलांसाठी खास कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहेत.

त्याही पलिकडे गोवा 

त्याही पलिकडे ‘गोवा : प्रकाश आणि आनंदाच्या कथा’ नावाचे विशेष प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनात एनबीटीच्या ‘स्टोरीज ऑफ लाईट अँड डिलाईट‘ आणि ‘गोवा‘ या शीर्षकांच्या अनुक्रमे मारिओ मिरांडा आणि शशी शेट्यो यांच्या कलाकृती सादर होतील. पुस्तकांच्याही पलीकडील ठरेल अशा या महोत्सवाच्या माध्यमातून प्रत्येक वयोगटातील लोकांच्या कल्पनाशक्तीला चालना देणे व त्यांची वाचनाची आजीवन आवड जतन करण्यासाठी कार्यक्रम आखलेले आहेत. त्यात खास करून कठपुतळी आणि संगीतमय कथाकथन सत्रे, माती कला कार्यशाळा, कार्टून बनवण्याच्या कार्यशाळा, पोस्टर आणि बुकमार्क बनविणे, घोषवाक्य लेखन, कथा रंगभूमी, रेखाचित्र कार्यशाळा, प्रश्नमंजूषा, लोकनृत्य सादरीकरण आणि ‘राउंड द रिडल’ सारखी सत्रे असणार आहेत.

मान्यवरांची भाषणे, चर्चा

महोत्सवात देशभरातील नामांकित लेखक, पत्रकार, विचारवंत, तत्वज्ञ, सर्जनशील व्यक्ती आदी मान्यवर भाषणे आणि चर्चांच्या माध्यमातून प्रेक्षकांशी संवाद साधतील. त्यात ज्येष्ठ लेखक उदय माहूरकर, प्रसिद्ध अभिनेत्री, मृणाल कुलकर्णी, अभिनेत्री अविका गौर, ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला, एसी, भारतीय हवाई दलाचे चाचणी वैमानिक आणि अंतराळवीर लेखक शांतनू गुप्ता, चित्रपट निर्माते चंद्रप्रकाश द्विवेदी, इतिहासकार मोहन शेट्यो, विदुषी आणि लेखिका मेधा खासगीवाले, माजी परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर, कायदेतज्ञ सुमंत बत्रा, अभिनेता अमोल पाराशर, अभिनेता सचिन पिळगावकर, प्रसिद्ध तत्त्वज्ञ सदानंद श्रीधर मोरे, तत्त्वज्ञ आचार्य प्रशांत यांचा समावेश आहे.

Advertisement
Tags :

.