वेगाने वाढतेय सागराची पातळी
प्रशांत महासागर ठरतोय शत्रू
प्रशांत महासागरात पाण्याची पातळी जगातील सरासरीपेक्षा अधिक वेगाने वाढत आहे. वर्ल्ड मेटरियोलॉजिकल ऑर्गनायजेशनच्या (डब्ल्यूएमओ) नव्या अहवालात हा इशारा देण्यात आला आहे. प्रशांत महासागरात वेगाने वाढणाऱ्या पातळीमुळे सर्वाधिक धोका बेटसदृश देशांना निर्माण झाला आहे. खासकरून कमी उंचीवरील बेटांना धोका आहे.
सागरी पातळी वाढण्याचे कारण बर्फ आणि हिमखंड वितळणे आहे. वाढत्या तापमानामुळे हे हिमखंड वितळत आहेत. पेट्रोल-डिझेल आणि कोळसा जाळल्याने तापमान वाढत आहे. याचा प्रभाव आता वायुमंडळावर दिसून येत आहे. हिमखंड वितळून त्यातील पाणी नद्यांच्या मार्गे समुद्रात पोहोचत आहे.
डब्ल्यूएमओच्या अहवालानुसार सध्या प्रशांत महासागर 3.4 मिलिमीटर प्रतिवर्ष दराने वाढत आहे. हा दर मागील तीन दशकांमधील आहे. तसेच हे प्रमाण उर्वरित जगाच्या वार्षिक सरासरीपेक्षा खूपच अधिक आहे. याची तपासणी प्रशांत महासागर, उत्तर आणि पूर्व ऑस्ट्रेलियात करण्यात आली आहे. डब्ल्यूएमओचे महासचिव सेलेस्टे साउलो यांनी हा प्रकार माणसांमुळे घडत असल्याचे नमूद केले आहे.
किनारी पूर
माणूस जोपर्यंत हवामान बदल रोखणे आणि तापमानवाढ कमी करण्याचे काम करणार नाही तोवर त्याला प्रलयच दिसून येणार आहे. समुद्र हा एकेकाळी माणसांचा मित्र होता, तो कुठल्याही क्षणी शत्रू ठरणार आहे. 1980 च्या तुलनेत सध्या किनारी पूरची संख्या आणि तीव्रता वाढत असल्याचे जग पाहत असल्याचे साउलो यांनी म्हटले आहे.
प्रशांत महासागरात आपत्ती
कुक आयलँड आणि फ्रेंच पोलीनेसिया येथे किनारी पूर येण्याचे प्रमाण पूर्वी कमी होते, परंतु आता हे प्रमाण खूपच वाढले आहे. हवामान बदल आणि तापमानवाढीमुळे किनारी पूर येण्याची संख्या आणि तीव्रता वाढली आहे. मागील वर्षी म्हणजेच 2023 मध्ये प्रशांत महासागरीय भागात 34 पेक्षा अधिक चक्रीवादळं आणि पूर यासारख्या घटना घडल्या आहेत. यामुळे 200 हून अधिक जणांना जीव गमवावा लागला आहे. अशाप्रकारच्या घटनांपासून वाचण्यासाठी केवळ एक तृतीयांश बेटांकडेच अर्ली वॉर्निंग सिस्टीम आहे. काही बेट तर सागरी पृष्ठभागापासून केवळ 3.3 ते 6.5 इंच उंचीवर आहेत. हे भूभाग सर्वप्रथम बुडतील, याचमुळे हवामान बदल रोखण्यासाठी तुवालू बेटाच्या विदेश मंत्र्यांनी 2021 मध्ये युएन क्लायमेट कॉन्फरन्स पाण्यात आयोजित केली होती अशी माहिती साउलो यांनी दिली आहे.