Karad Crime | कराडमध्ये 'भाईं'ची वरात! पोलिसांनी कोयता बहाद्दरांची भररस्त्यातून काढली धिंड
“भाईगिरी करणार का?” म्हणत पोलिसांचा दहशतविरोधी संदेश
कराड -आता भाईगिरी करणार का?... पुन्हा दहशत माजवणार का?... असे सवाल करत कराड शहर पोलिसांनी कोयता हल्ला प्रकरणातील संशयितांना चालत फिरवत सोमवारी शहरातून अक्षरशः त्यांची दहशत मोडीत काढण्याचा प्रयत्न केला. गेल्या काही दिवसांपासून शहरात कोयता हल्ले, दमदाटी आणि दहशत निर्माण करणाऱ्या टोळीविरोधात पोलिसांनी घेतलेल्या या कारवाईची शहरात जोरदार चर्चा सुरू होती.
कराड शहरात गेल्या काही दिवसांपासून साद मुलाणी आणि त्याच्या साथीदारांनी दहशतीचे वातावरण निर्माण केल्याची चर्चा होती. गत आठवड्यात भररस्त्यात कोयत्याने हल्ला करून दोघांना जखमी करण्यात आले होते. यापूर्वीही शहरात मारामाऱ्या, कोयता हल्ले आणि दहशत माजवण्याच्या अनेक घटनांमध्ये या टोळीचे नाव चर्चेत आले होते. या प्रकरणात साद आशापाक मुलाणी, सद्दाम गौसपाक शेख, आफताबजावेद नायकवडी, फरहान शाहहुसेन शेख, हुजेबा शब्बी शेख, शोएब आरिफ मोमीन आरकम मुल्ला यांना पोलिसांनी अटक केल्यानंतर पोलिसांनी सोमवारी सायंकाळी सूर्यवंशी मळा, विजय दिवस चौक, बसस्थानक परिसर तसेच संशयितांनी पूर्वी दहशत माजवल्याचे सांगितल्या जाणाऱ्या भागांतून चालत फिरवत त्यांची वरात काढली.
दराडे दरडावले की "नाही" हेच उत्तर
पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे, पोलीस निरीक्षक विजय गोडसे, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे निखिल मगदूम, उपनिरिक्षक शादीवान, शितल पाटील, अनिल स्वामी, मोसिन मोमीन, सज्जन जगताप, बीरज कोरडे, दिग्विजय सांडगे, अमोल देशमुख, यांच्यासह पोलीस व महिला पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते. शहरात निर्माण झालेल्या दहशतीला उत्तर देण्यासाठी पोलिसांनी घेतलेल्या या आक्रमक भूमिकेमुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
दराडे दरडावले की "नाही" हेच उत्तर
पोलिसांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे या संशयितांना पुन्हा भाईगिरी करणार का? असा मोठ्याने प्रश्न विचारत होते. संशयितांकडून 'नाही" असे मोठ्याने उत्तर घेत होते. स्वतःला भाई म्हणवणार का? असा प्रश्नही ते करत होते संशयितांकडून 'नाही' असे उत्तर ते घेत होते. नागरिकांच्या गर्दीतील लोकांना दराडे सांगत होते यांना भाई वगैरे म्हणून घाबरू नका. कायद्याच्या काचाट्यातून ते सुटत नाहीत. असे सांगत नागरिकांमध्ये निर्माण झालेली भीती दूर करण्याचा प्रयत्न केला.