शिल्पयोगी
भारतासह जगभरातील अनेक स्मारकशिल्पे घडविणाऱ्या महान शिल्पकार राम सुतार यांच्या निधनाने एका युगाचाच अस्त झाला आहे. शिल्पकला हे भारतीय संस्कृतीचे एक वैशिष्ट्या मानले जाते. खरे तर प्राचीन आणि अर्वाचीन किंवा आधुनिक असे शिल्पकलेचे दोन भाग करता येतील. यातील प्राचीन शिल्पकला ही अतिशय समृद्ध आणि विविधतेने नटलेली असून, यातून देशाच्या धार्मिक, आध्यात्मिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक व सामाजिक जीवनाचे दर्शन घडते. त्यामुळे आजही आपला देदीप्यमान व गौरवशाली इतिहास समजून घेण्यासाठी ही शिल्पकला उपयुक्त ठरते. अर्वाचीन किंवा आधुनिक काळातील शिल्पकलादेखील तितकीच महत्त्वपूर्ण होय. कारण त्यामध्ये पारंपरिकता, आधुनिकता, सौंदर्यशास्त्र व नवनिर्मितीचा नवोन्मेष प्रतिबिंबित होतो. आजमितीला या कलेचा वापर प्रामुख्याने स्मारकशिल्पे किंवा पुतळे तयार करण्यासाठी झाला असून, छत्रपती शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद, लोकमान्य टिळक, राष्ट्रपिता महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह अनेक महापुरुषांची स्मारकशिल्पे, त्यांचा जिवंतपणा सर्वसामान्यांसाठी मूर्तिमंत प्रेरणास्रोतच बनल्याचे पहायला मिळते. अर्थात याचे श्रेय जाते, ते आधुनिक काळातील श्रेष्ठतम शिल्पकारांना. राम सुतार हे त्यापैकीच एक. धुळ्यात जन्मलेल्या सुतार यांच्यावर महात्मा गांधी यांच्या विचारांचा प्रभाव पडला, तो स्वातंत्र्यचळवळीतील एका प्रसंगातून. धुळ्यातील गांधींच्या दौऱ्यात विदेशी कपड्यांची होळी करण्यात आली व त्यामध्ये सुतार यांनी स्वत:च्या डोक्यावरील टोपीचीही आहुती दिली होती. हाच नैतिक दृष्टीकोन घेऊन त्यांचा पुढचा प्रवास झाल्याचे दिसते. जे. जे. स्कूल ऑफ आर्ट अँड अॅग्रीकल्चरमधून सुवर्णपदक पटकावल्यानंतर खऱ्या अर्थाने शिल्पकलेच्या जगात त्यांचा प्रवेश झाला. अजिंठा आणि वेरूळ येथील शिल्पांना पूर्ववत करण्याचे त्यांनी केलेले काम महत्त्वपूर्णच म्हणावे लागले. 1954 ते 1958 अशी जवळपास चार वर्षे त्यांनी या प्रकल्पासाठी खर्ची घातल्याचे सांगण्यात येते. 1958 मध्ये दिल्लीची धरलेली वाट, त्यानंतर पत्करलेली सरकारी नोकरी व पुन्हा शिल्पकार म्हणून स्वत:ला वाहून घेण्याचा घेतलेला निर्णय हा त्यांच्या आयुष्यातील टर्निंग पॉईंटच म्हणता येईल. भारतीय स्वातंत्र्याचा काळ भारलेल्या वातावरणाचा होता. या काळातच सुतार यांची कला बहरली, वाढली आणि उत्तरोत्तर विकास पावली. त्या काळात विदेशातून येणाऱ्या पाहुण्यांना सुतार यांनी घडवलेला गांधींचा अर्धपुतळा भेट म्हणून दिला जात असे. यातच सर्व आले. गांधींचे त्यांनी किती पुतळे घडवले, त्याला प्रमाण नाही. देश विदेशातून त्यांच्या हस्तकौशल्यातून साकारलेले अनेक पुतळे आहेत. यातील प्रत्येक शिल्पातून करुण, शांततेबरोबरच जणू गांधीविचारच पाझरतो. इतके ते सजीव झाले आहेत. संसदेतील गांधी पुतळा ही त्यांची श्रेष्ठ कलाकृती म्हणता येईल. जगभरातून येणाऱ्या प्रत्येकासाठी हा पुतळा प्रचंड कौतुकाचा व कुतुहलाचा विषय असतो. जळगावमधील जैन हिल्स येथील गांधीतीर्थ येथील गांधीस्मारकही अजोड म्हणता येईल. छत्रपती शिवाजी महाराजांचीही अनेक शिल्पे त्यांनी उभारली आहेत. महाराजांचे पुतळे अनेक शिल्पकारांनी घडवले आहेत. परंतु, त्यांच्या शिल्पांतून घडणारे राजांचे तेज, पराक्रमाचे दर्शन वेगळेच म्हणता येईल. याशिवाय राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यासह अनेक महापुरुषांच्या पुतळ्यांची निर्मिती त्यांनी केली आहे. यामध्ये या महनीयांच्या व्यक्तिमत्त्वाबरोबरच त्यांच्या आचारविचारांची जी प्रभा प्रकटते, त्यातूनच सुतार यांच्या शिल्पांचे सर्वश्रेष्ठत्व अधोरेखित होते. अलीकडेच त्यांनी साकारलेली सरदार वल्लभभाई पटेल यांची स्टॅच्यु ऑफ युनिटी ही सर्वाधिक उंचीची शिल्पाकृती हा त्यांच्या शिल्पकलेच्या कारकिर्दीतील मैलाचा दगडच ठरावा. 47 महिन्यांच्या कालावधीत त्यांनी पुत्राच्या मदतीने आकारबद्ध केलेला हा प्रकल्प देशविदेशातील नागरिकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरावा, यातूनच त्याचे महत्त्व लक्षात येते. मुख्य म्हणजे वयाच्या शंभरीमध्येही इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या कामात ते गुंतले होते. या वयातही न थकता, न दमता ज्या पद्धतीने आपल्या प्रतिभेची अनुभूती समस्त देशवासीयांना त्यांनी दिली, ती अभूतपूर्व व ऐतिहासिक ठरते. प्रत्येक कलाकाराची एक शैली होती. राम सुतार यांचीही एक शैली होती. जिवंतपणा वा सजीवता हे त्यांच्या शिल्पकलेचे वैशिष्ट्या. शिल्पाच्या चेहऱ्यावरील अचूक भाव, अंगकाठीची हुबेहूब ठेवण याची त्याला जोड मिळत असे. सुतार यांनी केवळ प्रतिकृती उभारल्या नाहीत. शिल्पामध्ये संबंधितांचे स्वभावगुण, नेतृत्व, विचारधारा कशा प्रकट होतील, यावर कटाक्ष ठेवला. प्रमाणबद्धता आणि संतुलन याचाही योग्य समन्वय त्यांच्या शिल्पांमध्ये दिसतो. अलंकृततेचा अतिरेक त्यांनी नेहमीच टाळला. साधेपणातून भव्यत्व साधणे, हा त्यांच्या कलेचा विशेष म्हणावा लागेल. नवी दिल्ली हे भारताचे हृदयस्थान म्हणून ओळखले जाते. राम सुतार यांनी सुरुवातीचे काही दिवस राजधानीत सरकारी नोकरी केली. परंतु, तिथे त्यांचे मन रमले नाही. कारण शिल्पकला हाच त्यांच्या जगण्याचा श्वास व ध्यास होता. अखेरच्या श्वासापर्यंत शिल्पकला त्यांनी जपली आणि दिल्लीजवळील नोएडा येथे स्टुडिओ उभारत कलासाधनेत रमून गेले. राम सुतार यांनी हे अतिशय तत्त्वनिष्ठ होते. कलेवर त्यांचे असीम प्रेम, निष्ठा होती. त्यांच्या प्रत्येक शिल्पातून याचे प्रत्यंतर घडते. एखादे काम हाती घेतले, की ते त्यात देह भान विसरून गढून जात. कलाकृती पूर्ण होईपर्यंत ते स्वस्थ बसत नसत. त्यांच्या निधनाने कलेशी आत्यंतिक प्रामाणिक असलेल्या शिल्पयोग्यालाच देश मुकला आहे. इहलोकीची यात्रा त्यांनी संपवली असली, तरी कलाकृतीच्या माध्यमातून ते कायम जिवंतच राहतील. राम सुतार यांना भावपूर्ण आदरांजली.