वैद्यकीय महाविद्यालय आंदोलनात धक्काबुक्की
विजापूर येथील प्रकार : पालकमंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन
वार्ताहर/विजापूर
विजापूर येथे खासगी भागीदारीत सरकारी वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्यात यावे यासाठी 106 दिवस सातत्याने आंदोलन करण्यात येत आहे. पालकमंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन करताना आंदोलनकर्ते व पोलिसांत धक्काबुक्की झाल्याचा प्रकार गुरुवारी समोर आला. तसेच स्वामीजींनी एका पोलिसाला कपाळमोक्ष केल्याची घटनादेखील घडली. त्यामुळे वातावरण तणावाचे बनले होते. गेल्या अधिवेशनात विजापूर जिह्यात खासगी-सरकारी भागीदारीत (पीपीपी) वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याची घोषणा सरकारने केली होती. विजापूरमध्ये सरकारी वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करावे अशी मागणी करत पीपीपी वैद्यकीय महाविद्यालय नको, यासाठी 18 सप्टेंबरपासून आंदोलन सुरू आहे.
मागील 106 दिवसांपासून सरकारी वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्यासाठी आंदोलन समिती आंदोलन करत आहे. या कालावधीत विविध स्वरुपाची आंदोलने झाली आहेत. रस्त्यावर उतरून आंदोलन, जिल्हाधिकारी कार्यालयाला निवेदन, तालुक्यांमध्ये आंदोलन, रक्ताने लिहून स्वाक्षरी गोळा करणे, पत्र चळवळ, काळी वस्त्र परिधान करणे, रांगोळी आंदोलन, अशा विविध पद्धती वापरून आंदोलनकर्त्यांनी सरकारकडे मागणी मांडली. पण सरकारने आतापर्यंत कोणतेही सकारात्मक उत्तर दिले नाही.
19 नोव्हेंबर 2025 रोजी मंत्री एम. बी. पाटील यांनी आंदोलन समितीच्या प्रतिनिधींची मुख्यमंत्र्यांशी भेट घडवून आणली. परंतु मुख्यमंत्री आंदोलनकर्त्यांशी नीट बोलले नाहीत, ‘निधी उपलब्ध नाही’ असे उत्तर देऊन माघारी पाठवले, अशी आंदोलनकर्त्यांनी तक्रार केली. मुख्यमंत्र्यांच्या या वर्तनाचा संताप व्यक्त करत आंदोलनकर्त्यांनी आंदोलन तीव्र करीत डिसेंबर 1 रोजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, मंत्री एम. बी. पाटील, मंत्री शिवानंद पाटील आणि विजापूर जिह्याचे आमदार यांच्या पुतळ्यांची प्रतिकृती जाळून नाराजी व्यक्त झाली. यावेळी काही आंदोलकांनी डोक्यावर दगड ठेवून धरणे धरले. नवीन वर्षाच्या प्रारंभी मंत्री एम. बी. पाटील यांच्या घरासमोर धरणे धरण्यासाठी जाताना पोलिसांशी वाद झाला.आंदोलकांना पोलिसांनी अडवले, त्यातून वाद उद्भवला.