For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

टेम्पो स्क्रॅप केल्याचा बनाव; पोलिसांचा संशय बळावला अन् मित्राच्या घरातून टेम्पो जप्त!

10:23 AM Sep 11, 2026 IST | Tarun Bharat Portal
टेम्पो स्क्रॅप केल्याचा बनाव  पोलिसांचा संशय बळावला अन् मित्राच्या घरातून टेम्पो जप्त
Advertisement

कोल्हापूर : जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी दुचाकी, चारचाकींची चोरी करुन विक्री करणाऱ्या चौघा अट्टल चोरट्यांच्या टोळीला जेरबंद करण्यात जुना राजवाडा पोलिसांना यश आले आहे. ताब्यात घेतलेल्या संशयितांवर तब्बल १९ गुन्हे दाखल असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Advertisement

याप्रकरणी दर्शन जाधव (वय २४ रा. क्रांतीसिंह नाना पाटीलनगर, कोल्हापूर) रितेश दवडे (वय २३. रा. चव्हाणवाडी, गडमुडशिंगी, ता. करवीर), अजीज शेख (वय ३६ रा. हमीद पार्क, मकुंदनगर, जि. अहिल्यानगर), सत्यम कासार (वय २२ रा. आस्तगाव, ता. पारनेग, जि. अहिल्यानगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. शाहूनगर येथून चोरलेला टेम्पो तोडून त्याचे स्पेअर पार्ट वेगवेगळ्या ठिकाणी स्क्रॅपमध्ये विकल्याचा बनाव या टोळीने केल्याचे तपासात उघड झाले. पोलिसांनी त्यांच्याकडून एक टेम्पो, एक मोपेड जप्त केली असुन त्याची सुमारे दोन लाख रुपये किंमत आहे.

याबाबत जुना राजवाडा पोलीस निरीक्षक किरण लोंढे यांनी दिलेली माहिती अशी, शाहूनगर येथील रद्दीच्या गोडाऊन समोरून एका शाळेसमोर लावलेला टेम्पो चोरीला गेला होता. याची फिर्याद २६ जुलै रोजी दशरथ हेळकर यांनी जुना राजवाडा पोलिसांत दिली होती. याचा तपास जुना राजवाडा पोलीस व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतर्फे सुरु होता. तपासा दरम्यान पथकाला चोरीचा टेम्पो अजीज शेख (रा. पोखर्डी शेंडी, जि. अहिल्यानगर) याच्याकडे असल्याची माहिती मिळाली. त्याला ताब्यात घेतल्यानंतर हा टेम्पो सत्यम कासार आणि रितेश दवडे याने एक महिन्यापूर्वी विकल्याचे तपासातून समोर आले. त्यानंतर तीन्ही आरोपींना अटक करुन एलसीबीने आरोपींना जुना राजवाडा पोलिसांच्या ताब्यात दिले होते. त्यानंतर दवडे व शेख याच्याकडे कसून चौकशी केली असता हा टेम्पो कासार याच्या मदतीने अहिल्यानगर येथे विकल्याचे तपासात स्पष्ट झाले. शेख याने हा टेम्पो स्क्रॅप केल्याचा बनाव केला. मात्र पोलिसांचा संशय बळावला. हा टेम्पो त्याने अहिल्यानगरातील मित्राच्या घरी लपवून ठेवल्याचे स्पष्ट झाले. तसेच आरोपी जाधव यानेही दीड महिन्यापूर्वी आपटेनगर येथून मोपेड चोरल्याची कबुली दिली आहे.

Advertisement

पोलीस निरिक्षक किरण लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक अतिश म्हेत्रे, पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रशांत घोलप, नामदेव सुतार, अमर पाटील, प्रवीण सावंत, अमर अडसुळे, पोलीस कॉन्स्टेबल मोहन लगारे, स्वप्नील कांबळे, योगेश शिंदे, विनोद कांबळे, सचिन बेडंखळे, अतुल देसाई, प्रीतम सूर्यवंशी यांनी सहभाग घेत मोलाची कामगिरी बजावली.

चोरीचे १९ गुन्हे दाखल
दर्शन जाधव हा सराईत गुन्हेगार असल्याचे पोलीसांनी सांगितले, त्याच्यावर जुना राजवाडा, करवीर, कोडोली व लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात चोरीचे १३ गुन्हे दाखल आहे. त्यात बहुतांशी गुन्हे मोटारसायकल, कार चोरीचे आहेत, सत्यम कासार याच्यावर अहिल्यानगरात तीन गुन्हे, रितेश दवडे याच्यावर राहुरी, शाहूपुरी पोलिस ठाण्यात तीन गुन्हे दाखल आहेत, असे एकूण १९ चोरीचे गुन्हे दाखल असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.

दर्शन जाधव मास्टरमाईंड
वाहनांची चोरी कोणत्या भागात चोरायची, चोरलेली वाहने कोठे व कशी विकायची, चोरीन सहभागी असलेल्यांना पैशाचा किती वाटा द्यायचा याचे सर्व नियोजन दर्शन जाधव हा करत होता, चोरीच्या वाहनांच्या तो मुख्य सूत्रधार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Advertisement
Tags :

.