For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शेतसपाटीसाठी स्कॉर्पिओ...

06:41 AM Apr 13, 2025 IST | Tarun Bharat Portal
शेतसपाटीसाठी स्कॉर्पिओ
Advertisement

‘जुगाड’ हा शब्द कानावर पडला की, उत्तर प्रदेश आणि बिहार यांची आठवण होणे स्वाभाविक आहे. कारण या दोन राज्यांमधल्या लोकांच्या बऱ्याच ‘जुगाडकथा’ आपल्या कानावर पडत असतात. अनेक अवघड कामेही येथील लोक युक्तीचा प्रयोग करुन अशा प्रकारे उरकतात की अन्य प्रांतातील लोकांना आश्चर्य वाटल्याशिवाय रहात नाही. ज्या कामासाठी सर्वसाधारणपणे ट्रॅक्टरसारखे अवजड वाहत उपयोगात आणले जाते, ते काम स्कॉर्पिओचा उपयोग करुन करण्याची युक्ती हेच लोक करु शकतात. सध्या असा प्रकार गाजत आहे.

Advertisement

शेताची नांगरणी करुन त्यात बियाणे घातल्यानंतर त्या बियाण्यावर माती पसरुन शेताचे सपाटीकरण करावे लागते. ट्रॅक्टरच्या मागे एक लांब लाकडी पट्टी बांधून हे सपाटीकरण केले जाते. तथापि, ट्रॅक्टरच्या अनुपलब्धतेमुळे म्हणा, किंवा अन्य कोणत्याही कारणांसाठी म्हणा, बिहारमधील एका शेतात सपाटीकरणासाठी स्कॉर्पिओ गाडीचा उपयोग करण्यात आला आहे. स्कॉर्पिओच्या मागे एक लाकडी पट्टी बांधून त्यावर शेतकरी उभा राहून आपल्या शेताचे सपाटीकरण करत आहे, असे दृष्य सध्या सोशल मिडियावर प्रसारित होत आहे. ‘बिहारमे कुछवू संभव बा’ असे हा लाकडी पट्ट्यावर उभा असलेला शेतकरी म्हणत आहे. याचा अर्थ असा की हा बिहार आहे, येथे काहीही घडू शकते. तथापि, हा जुगाड नेमका कोणत्या राज्यातील, यावर सध्या सोशल मिडियावरच वाद रंगलेला दिसून येतो. काही लोकांचे म्हणणे असे आहे, की हे दृष्य बिहारमधील नसून उत्तर प्रदेशातील आहे. कारण या स्कॉर्पिओचा क्रमांक बिहारमधला नसून उत्तर प्रदेशातील आहे. तर काहींच्या म्हणण्यानुसार हे दृष्य बिहारमधीलच आहे. पण स्कॉर्पिओची नंबरप्लेट उत्तर प्रदेशातील आहे. आता खरे काय आणि खोटे काय ते नेमके सांगता येणे कठीण असले, तरी हा जुगाड लोकप्रिय होण्याची शक्यता मात्र आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.