नांदोशीनजीक स्कुटी जळून खाक
औंध :
खटाव तालुक्यातील नांदोशी ते औंध रस्त्यावर नांदोशीनजीक मंगळवारी दुपारी एका दुचाकी स्कूटी गाडीने अचानक पेट घेतला. भर रस्त्यात स्कूटीने पेट घेतल्याने काही काळ रस्त्यावरील वाहतूक खोळंबली होती.
सदरची गाडी गोपूज (ता. खटाव) येथील तुषार घार्गे यांच्या मालकीची आहे. दोन दिवसांपूर्वी गाडी वडूज येथे सर्व्हिसिंग करून घेतली होती. त्यानंतर मंगळवारी रहिमतपूर येथे कामानिमित्त गेले होते. माघारी गोपूजला येताना गाडीने रस्त्यात अचानक पेट घेतला. आगीने रौद्ररूप धारण केल्याने गाडी जळून खाक झाली. अचानक आग लागल्याने लाख रुपयांचे झालेले नुकसान कंपनी की शोरुम चालक भरून देणार? असा प्रश्न घार्गे यांनी केला. इलेक्ट्रीक दुचाकी पेटण्याचे प्रकार घडत असतात, मात्र पेट्रोलवरील स्कूटी पेटल्याने त्याबाबत घटनास्थळी चर्चा होती. घटनास्थळी नागरिकांनी गर्दी केली होती. गाडी पूर्ण जळून खाक झाल्याने घार्गे यांचे मोठे नुकसान झाले आहे.